Wed, May 27, 2020 12:41होमपेज › Goa › जोशुआ, दयानंद सोपटेंसह सहाजणांची उमेदवारी दाखल

जोशुआ, दयानंद सोपटेंसह सहाजणांची उमेदवारी दाखल

Published On: Apr 03 2019 1:44AM | Last Updated: Apr 03 2019 12:34AM
म्हापसा, हणखणे, फोंडा : प्रतिनिधी

म्हापसा, मांद्रे मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी भाजपतर्फे अनुक्रमे जोशुआ डिसोझा आणि दयानंद सोपटे यांनी तर गोसुमंच्यावतीने म्हापशात नंदन सावंत यांनी, मांद्रेतून स्वरूप नाईक समर्थकांच्या उपस्थितीत आपले उमेदवारी अर्ज मंगळवारी निवडणूक अधिकार्‍यांसमोर सादर केले. शिरोडा मतदारसंघातून पोटनिवडणुकीसाठी माजी मंत्री महादेव नाईक यांनी काँग्रेसतर्फे तर  गोवा सुरक्षा मंचतर्फे संतोष सतरकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.  

म्हापसा पोटनिवडणुकीसाठी जोशुआ यांनी हजारो समर्थकांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर, माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, भाजप सरचिटणीस सदानंद तानावडे उपस्थित होते. मांद्रे मतदारसंघात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत दयानंद सोपटे यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला.
जोशुआ आणि सोपटे यांचा प्रचार जोरदार सुरु असून दोन्ही उमेदवार प्रचंड मताधिक्क्याने विजयी होतील, असा विश्‍वास यावेळी उपस्थित नेत्यांनी व्यक्त केला. भाजप सरकारने राज्यात आणि केंद्रात केलेल्या विकासकामांची पोचपावती मतदार यावेळी देतील, असा विश्‍वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

शिरोडा मतदारसंघाचा  काँग्रेसचा उमेदवार म्हणून महादेव नाईक यांनी फोंडा उपजिल्हाधिकारी कार्यालयात  उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे आमदार रवी नाईक, क्लाफासियो डायस, फिलीप नेरी रॉड्रिगीस, जेनिफर मोन्सेरात, अ‍ॅड. वरद म्हार्दोळकर व काँग्रेसचे अन्य  कार्यकर्ते उपस्थित होते. 

महादेव नाईक म्हणाले की, आपल्या आमदारकीच्या काळात शिरोडा मतदारसंघात अनेक विकासकामे केली आहेत. आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून इस्पितळाची उभारणी केली. नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविण्यावर भर देण्यात आला.  शिरोडा मतदारसंघात यावेळेला पोटनिवडणूक लादलेल्या उमेदवाराला लोक धडा शिकवणार  आहेत.

शिरोडा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी गोवा सुरक्षा मंचतर्फे संतोष सतरकर यांनी  फोंड्यातील उपजिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक अधिकारी केदार नाईक यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळेला गोवा सुरक्षा मंचचे पदाधिकारी व समर्थक, कार्यकर्ते उपस्थित होते. 

म्हापसा पोटनिवडणुकीसाठी गोवा सुरक्षा मंचतर्फे  आर्कीटेक्ट नंदन सावंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल  केला. त्यांच्यासमवेत पक्ष प्रमुख सुभाष वेलिंगकर, अभय सामंत, परेश रायकर, गटाध्यक्ष किशोर राऊत, अ‍ॅड. रोशन सामंत व  इतर कार्यकर्ते उपस्थित होते.