Wed, Jul 08, 2020 12:15होमपेज › Goa › ‘ओपा’तून अखेर पाणीपुरवठा सुरू

‘ओपा’तून अखेर पाणीपुरवठा सुरू

Published On: Aug 22 2019 1:46AM | Last Updated: Aug 23 2019 1:29AM
फोंडा : प्रतिनिधी

केरये-खांडेपार येथे तुटलेल्या जलवाहिनीचे दुरुस्तीकाम बुधवारी पूर्ण झाल्यानंतर सकाळी साडेदहा वाजता, तब्बल सात दिवसांच्या खंडानंतर पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. दिवसभर कमी दाबाने टप्प्याटप्प्याने पाणी सोडण्यात आले. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत तिसवाडी तालुक्यातील बांबोळीसह इतर टाक्या भरण्याचे काम सुरू होते. काही आवश्यक ठिकाणी अल्पप्रमाणात ग्राहकांसाठी पाणी सोडण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांनी दिली.  

गेल्या गुरुवारी (ता. 15 ऑगस्ट) सकाळी केरये - खांडेपार येथील जलवाहिनी अचानकपणे तुटल्यानंतर तिसवाडी तालुक्यासह फोंडा तालुक्यातील काही भागांचा पाणीपुरवठा ठप्प झाला होता. गेले सात दिवस या भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागली. पाण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने पाण्याचे टँकर तैनात केल्याचे सांगितले असले तरी पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध न झाल्याने लोकांचे अतिशय हाल झाले. त्यातच खासगी टँकरवाल्यांनी अव्वाच्या सव्वा दराने पाणी विकून पैसा केला. पाणीपुरवठा ठप्प झाला तरी सरकारचा सुस्त कारभार आणि सार्वजनिक बांधकाम खात्याने दुरुस्तीसाठी निर्णय घेण्यास विलंब लावल्याने आवश्यक दुरुस्तीकाम नियोजित वेळेत झाले नाही, परिणामी लोकांच्या रोषाला सरकारी यंत्रणेला सामोरे जावे लागले. सरकारही पाण्याच्या नियोजनाबाबत सपशेल अपयशी ठरल्याचा ठपकाही ठेवला  गेला. दुरुस्तीचे हे काम चौपदरी रस्ताकाम करणार्‍या एमव्हीआर कंपनीकडून करण्यात आले असून त्यांना सार्वजनिक बांधकाम खात्याने सहाय्य केले आहे.

गेले सात दिवस बंद असलेला पाणीपुरवठा सोडल्याचे समजल्यानंतर टंचाईग्रस्त भागातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असून सकाळी जरी जलवाहिनीतून पाणी सोडले असले तरी मोठ्या टाक्यात हे पाणी भरण्यास उशीर लागल्याने ग्राहकांपर्यंत पाणी पोहोचण्यास विलंब झाला.