Tue, May 26, 2020 09:52होमपेज › Goa › खाणबंदीवर लवकरच तोडगा : मुख्तार अब्बास नक्वी 

खाणबंदीवर लवकरच तोडगा : मुख्तार अब्बास नक्वी 

Published On: Jun 04 2018 1:37AM | Last Updated: Jun 04 2018 1:33AMपणजी : प्रतिनिधी

राज्याच्या खाणबंदीच्या प्रश्‍नाबाबत भाजप गंभीर असून गोवा प्रदेश भाजपचे नेते केंद्र सरकारशी  तसेच योग्य अधिकारिणींशी सतत संपर्कात आहेत. सर्वोच्च न्यायालयात हा प्रश्‍न प्रलंबित असल्याने योग्यवेळी त्यावर तोडगा निघेल, असा विश्‍वास भाजपचे केंद्रीय नेते तथा अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचे मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी व्यक्त केला. वाढत्या इंधनदराबाबत जनतेबरोबरच केंद्र सरकारही गंभीर असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यावर गांभीर्याने  विचार करीत असून  निश्‍चितच ते योग्य तोडगा काढतील, असेही त्यांनी सांगितले.

केंद्रातील भाजप सरकारने 4 वर्षे पूर्ण केल्यानिमित्ताने सरकारच्या कामांची माहिती जनतेला देण्याच्या मोहिमेचा भाग म्हणून केंद्रीयमंत्री नक्वी  गोव्यात आले होते. पणजीत  आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे वाढते दर लोकांसाठी जाचक ठरत आहेत. सरकारलाही त्याची जाणीव आहे. इंधनदराची झळ सामान्यांना बसू नये या दृष्टीने गांभिर्याने काम सुरू आहे.       

लोकसभा, विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपच्या पराभवाबद्दल विचारले असता, नक्वी म्हणाले की, ही  पक्षासाठी मोठी चिंतेची बाब नाही. उलट भाजपविरोधी शक्ती एकत्र आल्यास त्यांची धाव कुठपर्यंत जाऊ शकते, याची कल्पना अगोदरच आल्यामुळे त्या दृष्टीने रणनीती ठरविणे पक्षाला आता शक्य होणार आहे. भाजपने ज्या स्थानिक पक्षांसोबत युती सरकार स्थापन केले आहे, त्या राज्यांत चांगले व स्थिर सरकार दिले आहे. आजही घटक पक्षांशी असलेली बांधिलकी भाजपने जपली असून जिथे शक्य नसेल तिथे नव्या पक्षांशी युती केली आहे. भाजपने कोणत्याही पक्षांसाठी युती करण्याबाबत ‘नो एंट्री’ फलक लावलेला नाही. 

भाजप राजवटीत देशात अल्पसंख्याकांवर हल्ले व अत्याचार होत असल्याचा भाजप विरोधकांचा कांगावा खोटा आहे. उलट भाजप सत्तेवर आल्यानंतर जातीय दंगलींना आळा बसला आहे. ज्या काही ठराविक घटना घडल्या त्यावरही त्वरित कारवाई करण्यात आली असून गुन्हेगारांना शासन करण्यात आले आहे. त्यामुळे भाजप सरकार हे सर्वसमावेशक सरकार असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मागील चार वर्षांत अल्पसंख्याक 2.66 लाख गरीब व गरजू  विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच 5.43 लाख युवकांना रोजगार प्राप्त झाला,  असे त्यांनी सांगितले.

एकाचवेळी निवडणुका घेणे देशहिताचे : नक्वी

लोकसभा आणि विधानसभा एकाचवेळी  घेण्याचा विचार हा देशाच्या आणि लोकशाहीच्या हिताचा आहे. सदर प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व विरोधकांना देताना विचार करण्याची विनंती केली असली तरी अन्य पक्षांमध्ये एकवाक्यता नाही. अवाढव्य खर्चाच्या दृष्टीने एकत्र निवडणुका घेणे आवश्यक असून त्यासाठी सर्व राजकीय पक्षांमध्ये आणि जनतेमध्ये एकवाक्यता होणे गरजेचे असल्याचे मत केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितले. 

विरोधकांत पंतप्रधानपदाचे डझनभर उमेदवार 

भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपला नेता मानला असून सर्व विकासशील मोहिमेत मोदी यांचाच चेहरा जनतेसमोर ठेवला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतर्फे पंतप्रधानपदासाठी मोदी यांचे एकमेव नाव आहे. मात्र संयुक्त पुरोगामी आघाडीकडे पंतप्रधान पदाच्या शर्यतीत राहुल गांधी,  सोनिया गांधी, मनमोहन सिंग, मायावती, अखिलेश यादव यांसारखी डझनभर नावे आहेत, असा टोला केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी हाणला.