Mon, May 25, 2020 11:11होमपेज › Goa › ‘नू-शि’तील नाफ्ता काढण्यासंदर्भात पाच सदस्यीय समिती : मुख्यमंत्री

‘नू-शि’तील नाफ्ता काढण्यासंदर्भात पाच सदस्यीय समिती : मुख्यमंत्री

Last Updated: Nov 08 2019 1:40AM

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतपणजी : प्रतिनिधी

दोनापावलाजवळ समुद्रात खडकावर अडकलेल्या ‘नू-शि-नलिनी’ जहाजातील नाफ्ता काढण्यासाठी ‘केंद्रीय शिपिंग महासंचालका’ने (डीजी शिपिंग) पाच सदस्यीय समिती नेमली असून ही समितीच नाफ्ता काढण्याच्या सर्व प्रक्रियेवर लक्ष व नियंत्रण ठेवणार आहे. नाफ्ता काढण्याची प्रक्रिया धोकादायक असल्याने त्यात चूक होऊ नये, यासाठी संपूर्ण काळजी घेतली जात असल्याने आता सदर प्रक्रिया आणखी काही दिवस लांबणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. 

 मुख्यमंत्री सावंत यांनी पत्रकारांना सांगितले की, नाफ्ता काढण्यासंबंधी सर्व प्रक्रिया ‘एमपीटी’ आणि ‘डीजी शिपिंग’ हेच हाताळणार आहेत. ही प्रक्रिया नेमकी कोणी व कशा पद्धतीने करावी, यावर निर्णय न झाल्याने सदर प्रक्रिया थोडी पुढे गेली आहे. ‘डीजी शिपिंग’ने नाफ्ता प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी पाच सदस्यीय समिती नेमली असून त्यात राज्याचे मुख्य सचिव परिमल राय, एमपीटीचे अध्यक्ष आणि ‘डीजी शिपिंग’चे 3 सदस्य यांचा समावेश आहे. सावंत म्हणाले की, नाफ्ता काढण्यासाठी विदेशातील तज्ज्ञ आणि अनुभवी कंपन्यांची मदत घेतली जाणार असून अजूनही सरकारने कुठल्याही कंपनीला कामाचे आदेश दिलेले नाहीत. काम दिले जाईल त्या कंपनीला ‘डीजी शिपिंग’च्या आदेशाची पूर्तता करण्याचे आश्वासन द्यावे लागणार असून सुरक्षिततेसंबंधी सर्व अटींचे पालन करावे लागणार आहे.

नाफ्ता हाताळण्याच्या प्रक्रियेत काही दुर्घटना झाली अथवा गळती झाली तर त्याला एमपीटीलाच जबाबदार धरले जाणार आहे. एमपीटीनेच सदर नाफ्तावाहू जहाजाला जुलै महिन्यात मुरगाव बंदरात प्रवेश करण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर एमपीटीनेच सदर जहाज वार्‍यावर सोडले असल्याचे सावंत यांनी सांगितले. 

 सर्व ती काळजी घेणार : मुख्यमंत्री सावंत
 नाफ्ता हलविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा व यंत्राचा वापर केला जाणार असून विविध पर्यायांचा अभ्यास केला जात आहे. नाफ्त्याची गळती होऊ नये म्हणून सर्व काळजी आणि उपाय अवलंबिले जाणार आहेत. शुक्रवारपर्यंत त्यावर निर्णय होणार आहे. जहाजासभोवताली ‘बुम बॅअरिंग’ आणि ‘सक्शन पंप’ सज्ज ठेवले जाणार आहेत. नाफ्ता काढताना सरकारकडून 100 टक्के सुरक्षा उपाय हाती घेतले जाणार असून त्याविषयी विरोधी काँग्रेसने आम्हाला शिकवू नये, असा टोमणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मारला.