Fri, May 29, 2020 21:31होमपेज › Goa › राज्यात 1 जूनपासून  मासेमारीस बंदी 

राज्यात 1 जूनपासून  मासेमारीस बंदी 

Last Updated: May 22 2020 1:32AM
पणजी : पुढारी वृत्तसेवा 

राज्यात 60 दिवस मासेमारीवर  बंदी घालणारा आदेश गुरुवारी मत्स्योद्योग खात्याच्या संचालिका शमिला मोंतेरो यांनी जारी केला. या आदेशानुसार  1 जून ते 31 जुलैपर्यंत मासेमारीवर बंदी लागू असेल. नव्या मासेमारी हंगामाला 1 ऑगस्टपासून सुरुवात होईल. मासेमारीबंदीच्या  60 दिवसांच्या  काळात यांत्रिकी बोटी, मच्छीमारी ट्रॉलर्सद्वारे मासेमारी करण्यावर बंदी असेल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

जून ते जुलै अर्थात पावसाळ्याचे हे दोन महिने माशांचा प्रजननकाळ असतो. या काळात सरकारकडून मासेमारीवर बंदी घातली जाते. या बंदीकाळात मच्छीमारी ट्रॉलर्सकडून नियम भंग करून मासेमारी केली जाऊ नये, यासाठी मच्छीमार खात्याकडून कडक देखरेख ठेवली जाते. मासेमारी बंदी लागू झाल्यानंतर 1200 हून अधिक मच्छीमारी ट्रॉलर्स मालीम, कुटबण आदी राज्यातील विविध मासेमारी जेटीवर नांगरून ठेवले जातात. मासेमारी बंदीचा आदेश 31 मे रोजी  मध्यरात्री 12 वाजल्यापासून अमलात येईल. बंदीकाळात  यांत्रिकी बोटींद्वारे मासेमारी करताना कुणीही आढळून आल्यास त्याच्यावर सक्त कारवाई केली जाईल, असा इशाराही आदेशात देण्यात आला आहे. 

मासेमारी बंदीकाळात  मासळीची आवक घटत असल्याने जी काही मासळी उपलब्ध होते  त्याच्या किंमतीत बरीच वाढ करुन ती विकली जाते. त्याप्रमाणे या काळात  गोड्या पाण्यातील मासळीला विशेष मागणी असते. मच्छीमारी ट्रॉलर्स तसेच यांत्रिकी बोटींवर मासेमारी करण्यावर या काळात बंदी असली तरी पारंपरिक मच्छीमार लहान होडया घेऊन मासेमारी करताना दिसून येतात.