Tue, Oct 23, 2018 18:11होमपेज › Goa › चक्रीवादळामुळे मासेमारी ठप्प

चक्रीवादळामुळे मासेमारी ठप्प

Published On: Oct 12 2018 1:04AM | Last Updated: Oct 12 2018 1:04AMपणजी : प्रतिनिधी

‘लुबान’ आणि ‘तितली’ चक्रीवादळामुळे खवळलेल्या समुद्रामुळे राज्यातील मासेमारी  व्यवसाय ठप्प झाला आहे.  सुमारे 70 टक्के ट्रॉलर्स राज्यातील विविध जेटींवर अथवा अन्य सुरक्षित ठिकाणी नांगर टाकून आहेत. ट्रॉलर्स मासेमारीसाठी जात नसल्याने परराज्यातील कामगार आराम करत असल्याचे मालिम जेटीवरील ट्रॉलरमालक तथा मांडवी फिशरमेन्स को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे माजी अध्यक्ष सीताकांत परब यांनी सांगितले. 

समुद्रात जोरदार लाटा उसळत असल्याने आणि वादळी वारे वाहत असल्याने राज्यातील मच्छिमारी ट्रॉलर किनार्‍यावर परतले असून मच्छिमारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गोव्यात मासेमारी ठप्प झाली आहे. मालिम व्यतिरिक्त कुटबण, शापोरा, कुठ्ठाळी, वास्को, बेतुल या मोठ्या मच्छिमारी जेटींवर  मासेमारी ठप्प झाली आहे. बाजारात मासळीची आवक फारच घटली आहे. किनारपट्टी भागात पर्यटकांना तसेच शॅक्स मालकांनाही दक्ष राहण्याचे आवाहन पर्यटन खात्याने केले आहे. 

परब म्हणाले की, हवामान खात्याने दिलेल्या इशार्‍यावरुन गेल्या 7 ऑक्टोबरपासून मच्छीमारी ट्रॉलर बंद आहेत. सुमारे 70 टक्के ट्रॉलर्स जेटीवर नांगर टाकून आहेत. जे काही ट्रॉलर्स खोल समुद्रात मासेमारीसाठी गेले होते ते मुरगाव बंदरात किंवा अन्य सुरक्षित ठिकाणी नांगर टाकून आहेत. चक्रीवादळ खोल समुद्रात घोंघावत असले तरी किनार्‍यावर त्याचा परिणाम जाणवत आहे. किनार्‍यावर भरतीच्या आणि ओहोटीच्या वेळी पाण्याचा प्रवाह प्रचंड असतो. त्यामुळे  यांत्रिकी होड्यांद्वारे केली जाणारी मच्छिमारीही ठप्प झाली आहे. भरतीच्या वेळी किनार्‍यावर मोठ्या लाटा दिसून येतात. यामुळे पुढील दोन दिवस मासेमारी शक्य नाही.

वादळाच्या पार्श्‍वभूमीवर पणजी वेधशाळेने मच्छिमारांना 14 ऑक्टोबरपर्यंत सतर्कतेचा इशारा दिला असून मच्छिमारांना खोल समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याची सूचना दिली आहे. आधी हा इशारा 12 ऑक्टोबरपर्यंत होता. दरम्यान, या वादळाची तीव्रता कमी होत जाणार असल्याचे हवामान वेधशाळेचे संचालक एम. एल. साहू यांनी सांगितले.