Mon, Aug 19, 2019 20:23होमपेज › Goa › पणजी बाजारात मासळीचे दर भडकले

पणजी बाजारात मासळीचे दर भडकले

Published On: Nov 15 2018 1:05AM | Last Updated: Nov 14 2018 11:45PMपणजी : प्रतिनिधी

परराज्यातून मासळीच्या आयातीवर बंदी लागू झाल्यानंतर मासळीच्या किंमतींवर  त्याचा  परिणाम दिसू लागला आहे.  पणजी बाजारात   मोठ्या पापलेटचा दर 1 हजार रुपये प्रती किलो इतका झाला आहे. याशिवाय अन्य मासळीच्या किंमतीत देखील  वाढ झाली आहे. मासळी आयातबंदीमुळे चिकन व अंड्ड्यांना मागणी वाढली आहे. चिकन 130 रुपये किलो तर  अंडी 60 रुपये डझन दराने विकले जात आहे.

अन्‍न व औषध प्रशासना(एफडीए)कडे नोंदणी नसलेल्या मासळी विक्रेत्यांनी  नोंदणी करेपर्यंत आयात मासळीवर राज्यात बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे याचे परिणाम हळू हळू  राज्यातील विविध मासळी बाजारांत दिसून लागले आहेत.

बाजारात एरवी 500 ते 600 रुपये किलो रुपयांना मिळणारी मोठी सफेद पापलेट आता 1 हजार रुपये  किलो  या दराने विकले जात आहेत. याशिवाय वेरली 600 ते 700 रुपये किलो, लेफा  200 रुपये किलो, कोळंबी 500 रुपये किलो.  मध्यम आकाराचे इसवण 400 रुपये किलो, लहान बांगडूले 100 रुपयांना 12 तर मध्यम आकाराचे बांगडे  100 रुपयांना 6 ते 8,  या दराने विकले जात आहेत. 

बाजारात मासळी उपलब्ध असली तरी आता त्यांच्या किंमतीत वाढ झाली आहे. मासळी महाग झाल्याने  ती खरेदी करताना  मत्स्यप्रेमींकडून  ती खरेदी करायला ग्राहक हात आखडता घेत आहेत.  याचा फटका  किरकोळ मासळी विक्रेत्यांना बसत आहे. 

फॉर्मेलिनयुक्‍त मासळीच्या विषयावरून सरकारने नुकतीच  मासळी आयातीवर गोव्यात सशर्त बंदी लागू केली आहे.  या बंदीतून काही प्रमाणात मासळी विक्रेत्यांना मुभा  देण्यात आली असली तरी  मासळीचे दर सध्या भडकले आहेत.