होमपेज › Goa › एफडीएच्या अटी पाळणार्‍यांना मासळी आयातीची मुभा

एफडीएच्या अटी पाळणार्‍यांना मासळी आयातीची मुभा

Published On: Nov 14 2018 1:43AM | Last Updated: Nov 14 2018 12:23AMपणजी : प्रतिनिधी

राज्यात मासळी आयात बंदी लागू करण्याचा अध्यादेश मंगळवारी जारी करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनालयातर्फे (एफडीए) लागू करण्यात आला असला तरी सुरक्षा अटींची पूर्तता करणार्‍यांनाच मासळी आयातीची परवानगी दिली जाणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी दिली. 

आरोग्यमंत्री राणे यांनी शनिवारी राज्यात सहा महिने मासळी आयात बंदी घालण्याचे सूतोवाच केले होते. यासंबंधीचा अध्यादेश सोमवारी काढला जाणार असल्याचे राणे यांनी पत्रकारांना सांगितले होते. मात्र, या घोषणेबाबत  काही मंत्र्यांकडून आणि जनतेकडून टीका झाल्यावर आपली भूमिका सौम्य करताना एक दिवस उशिराने नवा अध्यादेश काढताना, केवळ एफडीएची मार्गदर्शक तत्त्वे पाळणार्‍यांनाच राज्यात मासळी आयात करण्यास परवानगी देण्याचे आरोग्य साधला असता ते म्हणाले की, या संबंधीची फाईल आपण अ‍ॅटर्नी जनरल दत्तप्रसाद लवंदे यांच्याकडे सल्ल्यासाठी पाठवली होती. त्यावर लवंदे यांनी काही प्रश्‍न उपस्थित करून शंकासमाधान केल्यामुळे हा उशीर झाला आहे.      
मासळी आयातबंदीचा फटका नियमीत व्यवहार करणार्‍या पंचतारांकीत हॉटेल वा निर्यात व्यावसायिकांना  होऊ नये म्हणून सरसकट बंदी न घालण्याचे प्रशासनाने ठरविले आहे. एफडीएच्या अटी पाळणार्‍यांना आता मासळी आयात करण्याची मोकळीक देण्याचे मंगळवारी काढण्यात आलेल्या अध्यादेशात  नमूद करण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले.  दरम्यान, खासगी बसमधून बॉक्सचा वापर करून छुप्या पद्धतीने मासळीची चोरटी आयात करणार्‍यांविरूद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश आरोग्यमंत्री राणे यांच्याकडून देण्यात आले आहेत. 

मडगाव घाऊक मासळी बाजारात कंटेनर्समध्ये ‘ई-कोलाय’

मडगाव : प्रतिनिधी 

मडगाव येथील घाऊक मासळी  बाजारात मोठ्या प्रमाणात गलिच्छता  पसरली असून तेथील कंटेनरमध्ये तसेच सांडपाण्यात कॉलिफॉर्म  आढळला आहे. त्यात जीवघेण्या ई-कोलाय बॅक्टेरियाचाही अंश गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने मंगळवारी केलेल्या पाहणीत आढळून आला. परिणामी हा बाजार प्रदूषित असल्याचे मंडळाने घोषित केले आहे. हा घाऊक बाजार अस्वच्छ असल्याने येथून ये-जा करणार्‍यांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो.   
गोव्यातील सर्वात मोठा मासळी बाजार अशी ख्याती असलेल्या एसजीपीडीएची घाऊक बाजारपेठ यापूर्वी तेथील गलिच्छतेसाठी 

चर्चेत आली होती. येथील सांडपाण्याची, मासळी कंटेनरच्या पाण्याची तसेच अन्य ठिकाणी वाहत्या पाण्याची तपासणी केल्यानंतर त्या नमुन्यामध्ये अत्यंत जीवघेण्या विषाणूचे  अंश सापडले. येथे निर्माण होणार्‍या दूषित पाण्यामुळे साळ नदीच्या स्वच्छतेवर अवर्षण आले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने या मार्केटातील पाण्याचे नमुने तपासले असता, गटारातील पाण्यात 1.70 कोटी तर मासळीच्या कंटेनरमधील पाण्यात 5.40 कोटी प्रतिलिटर मिलिग्रॅम या प्रमाणात कॉलिफॉर्मचे अंश सापडले.

मासळीच्या खोक्यात असलेल्या पाण्यात तब्बल 9.30 कोटी कॉलिफॉर्मचे प्रमाण सापडले. साळ नदीत सोडलेल्या सांडपाण्याच्या नमुन्यांची तापासणी केल्यावर प्रति लिटर मिलीग्राम 54,000 कॉलिफॉर्मचे प्रमाण सापडले आहे. या नदीतील पाण्यात फेसल कॉलिफॉर्मचे प्रमाण 22 हजार, आमोनिकल नायट्रोजनचे प्रमाण प्रति लिटर मिलिग्रॅम 0.52 तर फोस्फेटचे प्रमाण 0.232 दिसून आले आहे. पाण्याच्या नमुन्यात ई कोलायचे प्रमाण असून आमोनिकल नायट्रोजन आणि फोस्फेट या घातक द्रव्याचा अंश सापडल्याचे गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या चाचणीत सिद्ध झाले. 

मडगावातील  स्वयंसेवी संघटनेचे कार्यकर्ते संजीव रायतुरकर यांनी गोवा प्रदूषण नियंत्रणकडे तक्रार दाखल केली होती.  त्या तक्रारीची दखल घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाने  या बाजाराची तपासणी करून पाण्याचे नमुने घेतले. येथील सांडपाण्यात सापडलेल्या विषाणूचा अंश  मानवी आरोग्याला धोकादायक असून या पाण्यामुळे साळ नदीचे पाणीही  मोठ्या प्रमाणात दूषित झाल्याचे  स्पष्ट झाले आहे. यावर संबंधित प्रशासनाने उपाययोजना करावी, अशी मागणी संजीव रायतुरकर यांनी केली आहे.