Thu, Jul 02, 2020 15:58होमपेज › Goa › वास्कोत ७ दुकानांना आग; २० लाखांची हानी

वास्कोत ७ दुकानांना आग; २० लाखांची हानी

Published On: Dec 26 2018 1:15AM | Last Updated: Dec 26 2018 1:15AM
वास्को : प्रतिनिधी

येथील जुन्या बस स्थानकाजवळ सिने वास्को थिएटरच्या मागे रांगेत असलेल्या सात दुकानवजा गाड्यांना मंगळवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीत सुमारे 20 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
सदर आग मंगळवारी पहाटे पाच ते सव्वापाच वाजण्याच्या सुमारास लागल्याचा अंदाज आहे. दुकानांसमोर असलेल्या सुलभ शौचालयाबाहेर असलेल्या एका दिव्यांग व्यक्तीने दुकानातून धूर येत असल्याचे पाहून जवळ उभ्या असलेल्या युवकाला सांगितले. लगेच त्याने इतरांच्या मदतीने पोलिस व अग्निशमन दलाला याची माहिती दिली.  अग्निशमन दलाचे बंब दाखल होईपर्यंत अर्ध्या तासात सात दुकाने जळून खाक झाली.

वेळीच आग आटोक्यात आल्याने बाजूला असलेली इतर दुकाने आगीच्या झळांपासून वाचली. गोवा अग्निशमन दल आणि मुरगाव पोर्ट ट्रस्ट मिळून एकूण चार बंब घटनास्थळी दाखल झाले होते.पहाटे लागलेल्या आगीमध्ये श्रीकांत बोरकर यांचे  लेदर  बॅगेचे दुकान   तसेच त्यांची अन्य सजावट साहित्याची   दोन दुकाने जळून खाक झाल्याने एकूण 18 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. तीन केश कर्तनालये, एक ज्यूस सेंटर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असून ती रमाकांत चव्हाण, अंबिका नाईक व सुदेश होणरकर यांच्या मालकीची असल्याचे वास्को पोलिसांनी सांगितले. जवळच असलेल्या अन्य काही दुकानांचेही किरकोळ नुकसान झाल्याचा अंदाज आहे. स्थानिक नगरसेवक कृष्णा साळकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मामलेदारांची बुधवारी भेट घेऊन आर्थिक मदतीसाठी प्रयत्न  करणार आहे, असे त्यांनी सांगितले.