होमपेज › Goa › जप्त साहित्याच्या लिलावाला मिळेना मुहूर्त

जप्त साहित्याच्या लिलावाला मिळेना मुहूर्त

Published On: Jan 18 2019 1:37AM | Last Updated: Jan 17 2019 9:59PM
मडगाव : प्रतिनिधी 

दोन महिनानापूर्वी मडगाव पालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम राबवून  शहरातील दुकानांच्या बाहेर ठेवण्यात आलेले समान जप्त करून ठेवले होते.जप्त केलेले लाखो रुपयांचे सामान महिनाभर  पालिकेत पडून राहिल्याने समान चोरीला जात असल्याचे वृत्त ‘पुढारी’त प्रसिद्ध होताच 24 तासात पालिका कार्यालयात ठेवलेले जप्त सामान अन्यत्र  हटविले. मात्र या जप्त सामानाचा लिलाव  करण्याची अनेक वेळा पालिकेचे मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक यांनी केलेली घोषणा मात्र हवेतच विरल्याचे दिसत आहे. अजूनही पालिकेला लिलावासाठी मुहूर्त मिळत नसल्याचे पालिकेत पडून असलेल्या साहित्याच्या साठ्यावरून दिसत आहे. 

पालिका मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक यांनी 2018 च्या अखेरीस रस्त्यांवर किंवा पदपथावर अतिक्रमण करणार्‍यांवर कठोर कारवाई करून सर्व सामान जप्त केले होते. सुमारे आठ लाख रुपयांचा जप्त माल  पालिकेच्या प्रवेशद्वारावर पडून होता. हार्डवेअर, घरगुती किचन डेकोरेशन, विद्युत उपकरणे, कपडे, डेकोरेशन चे साहित्य, स्टील साहित्य,   घर सजावटीसाठी लागणारे पडदे, उशी गाद्या, प्लास्टिक स्टूल व खुर्च्या, प्लास्टिक पिशव्या  आदींचा समावेश आहे.  हे साहित्य  पालिकेच्या प्रवेशद्वारावर असल्याने  दररोज ये-जा करणार्‍यांना याचा त्रास होत होता. त्याशिवाय पहिल्या मजल्यावर व पालिका बैठक कक्षाच्या वारांड्यांत जप्त केलेले साहित्य ठेवण्यात आले. पुढारी वृत्तपत्रात जप्त केले गेलेले सामान चोरीला जात असल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच मुख्याधिकार्‍यांनी चोविस तासांच्या आत समान हटवून मालभट येथे पालिकेच्या एका जागेत स्थलांतरित केले. 

मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक ‘पुढारी’शी बोलताना डिसेंबर 2018 च्या दुसर्‍या आठवड्यात   सांगितले होते की, हे सर्व सामान मालभट येथील  एका इमारतीत हलविण्यात आले आहे.  येत्या आठवड्यात या सामानाचा लिलाव करण्यात येणार आहे. अशी माहिती नाईक यांनी दिली होती. 

नगराध्यक्षा डॉ. बबिता प्रभुदेसाई यावेळी म्हणाल्या होत्या की, येत्या दहा दिवसांत वृत्तपत्रात नोटिसा प्रसिध्द झाल्यावर या सामानाचा लिलाव करण्यात येणार आहे. मात्र जुने वर्ष संपून नवे वर्ष सुरू झाले. नववर्षाचा पहिला महिनाही अर्धा उलटला मात्र अजूनही साहित्य लिलावात काढण्याचा  पालिकेला मुहूर्त मिळालेला नाही. सद्या लिलावाच्या विषयावर भाष्य करण्याचे पालिका टाळत आहे. यात  राजकीय दबावाखाली पालिका कारवाई करत नाही की काय,अशी  पालिका वर्तुळात चर्चा आहे.

लवकरच लिलाव : सिद्धिविनायक नाईक

मुख्याधिकरी सिद्धिविनायक नाईक  ‘पुढारी’शी बोलताना म्हणाले की, जप्त केलेल्या सामानाचा  लिलाव होणार हे निश्चित असून त्यापूर्वी अनेक कामे पूर्ण करण्याची जबाबदारी पालिकेवर आहे. पालिकेत प्रलंबित असलेली काही महत्वाची कामे पूर्ण झाल्यावर पालिका लवकरच या सामानाचा लिलाव करणार आहे.