Tue, May 26, 2020 04:21होमपेज › Goa › रेल्वेच्या ई-तिकिटांचा काळाबाजार उघड; मडगावात दोघांना अटक

रेल्वेच्या ई-तिकिटांचा काळाबाजार उघड; मडगावात दोघांना अटक

Published On: Jun 17 2019 2:08AM | Last Updated: Jun 17 2019 2:08AM
मडगाव ः प्रतिनिधी

रेल्वेच्या ई तिकीट विक्रीच्या काळा बाजाराचा कोकण रेल्वे पोलिसांनी ऑपरेशन थंडर अंतर्गत केलेल्या कारवाईत पर्दाफाश केला. मडगावातील एका मोबाईल दुकानावर छापा टाकून 2 लाख 60 हजार रुपये किंमतीची एकूण 119 ई तिकीटे जप्त केली व दुकानमालक अर्जुन गिरवोळी (वय 23) व त्याचा भागीदार ऋषी मिश्रा (26) या दोघांना अटक केली.

येथील मोबाईल वर्ल्ड या दुकानातून रेल्वेच्या ई तिकिटांचा काळा बाजार होत असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे रेल्वे पोलिसांनी सापळा रचून मोबाईल वर्ल्ड दुकानावर छापा टाकला. यावेळी अर्जुन गिरवोळी व त्याचा साथीदार ऋषी मिश्रा हे दोघे दुकानात उपस्थित होते. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता हे दोघेजण व्यवसायात भागीदार असल्याचे त्यांना आढळून आले. या दोघांकडून लॅपटॉप आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. त्यांना न्यायालयात उभे केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोघेजण वेगवेगळे युजर आयडी वापर करून तिकीटांचे आरक्षण करत होते. रेल्वेच्या नियमानुसार अशा प्रकारे ई तिकिटांची खरेदी करणेही गुन्हा ठरतो.प्रत्येक तिकीटामागे संशयितांना पाचशे ते आठशे रुपये कमिशन मिळत होते. रेल्वे पोलीसांनी देशभरात अशा स्वरूपाची कारवाई राबवून मोठ्या प्रमाणात बोगस एजंटांच्या मुसक्या आवळल्या आहेत. गोव्यात अशा स्वरूपाची ही पहिलीच कारवाई असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. ऑपरेशन थंडर असे या मोहिमेचे नाव असून येणार्‍या दिवसांत अन्य काहीजण पोलिसांच्या तावडीत सापडणार असल्याचे समजते.