Mon, May 25, 2020 03:49होमपेज › Goa › इफ्फीतील चित्रपटांचे कला अकादमीत प्रदर्शन : गावडे

इफ्फीतील चित्रपटांचे कला अकादमीत प्रदर्शन : गावडे

Published On: Sep 28 2019 1:20AM | Last Updated: Sep 28 2019 1:20AM
पणजी : प्रतिनिधी

आगामी ‘इफ्फी’मध्ये कला अकादमीच्या मुख्य दीनानाथ मंगेशकर सभागृहात चित्रपटांचे स्क्रिनींग केले जाणार असून त्यासाठी किरकोळ स्वरूपाची दुरूस्ती व सुशोभीकरण करावे लागणार आहे, असे कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी दोनापावला येथे पत्रकारांशी अनौपचारीकरित्या बोलताना सांगितलेे.

मंत्री गावडे म्हणाले की, आपण कला अकादमीच्या बांधकामासंबंधी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी आगामी ‘इफ्फी’तील काही चित्रपटांचे प्रदर्शन अकादमीच्या मुख्य सभागृहात करण्यास मान्यता दिली आहे. यासाठी रंगकाम आदी लहान-सहान गोष्टी कराव्या लागणार आहेत. 

कला अकादमीच्या बांधकामाच्या स्थितीसंदर्भात अहवाल आपल्याकडे आला असून त्याचा अभ्यास सुरू आहे. आपण सर्व गोमंतकीयांना पुन्हा सांगू इच्छितो की, अकादमीची वास्तू पाडली जाणार नाही. मात्र, सदर बांधकामाविषयी कोणताही निर्णय घेण्याआधी सर्व घटकांशी चर्चा केली जाईल, असेही गावडे यांनी सांगितले. 

अकादमीसाठी अवाढव्य खर्च नाही : गावडे

अकादमीतील सभागृहाचा काही भाग समुद्रपातळी खाली येत असल्याने भरतीच्यावेळी पाणी झिरपण्याची समस्या आहे. अकादमीची इमारत आहे, त्या स्थितीत राहिली तर ही समस्या कायम असणार आहे. यासाठी अकादमीच्या एक मजल्याची पातळी वाढवण्याची गरज असली तरी अकादमीचे बांधकाम पाडून अवाढव्य खर्च करण्याची सरकारची तयारी नाही, असे कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले.