Mon, May 25, 2020 12:24होमपेज › Goa › कर्फ्यूमधून अत्यावश्यक सेवा वगळल्या; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा

कर्फ्यूमधून अत्यावश्यक सेवा वगळल्या; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा

Last Updated: Mar 22 2020 11:23PM
पणजी : पुढारी वृत्तसेवा

‘कोरोना व्हायरस’संबंधी राज्यातील लोकांनी ‘जनता कर्फ्यू’ला दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल आभार मानून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘जनता कर्फ्यू’ आणखी तीन दिवस वाढवणार असल्याचे रविवारी सायंकाळी घोषित केले. आरोग्य, पेट्रोलपंप, फार्मसी आदी अत्यावश्यक सेवा कर्फ्यूमधून वगळण्यात आल्या आहेत. येत्या 25 मार्चच्या (बुधवारी) मध्यरात्रीपर्यंत राज्यात पूर्णत: ‘लॉकडाऊन ’ लागू असणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘कोरोना व्हायरस’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या आवाहनाला अनुसरून गोव्यासह सर्व देशात ‘जनता कर्फ्यू’ लागू करण्यात आला होता. राज्यात ‘जनता कर्फ्यू’ यशस्वीरीत्या पाळण्यात आल्याचा संदेश मुख्यमंत्री सावंत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना फोनवरून कळविला. केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानंतर, यासंबंधी रविवारी संध्याकाळी जनतेला उद्देशून ‘व्हीडीओ’ संदेशात मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, राज्यातील ‘जनता कर्फ्यू’मध्ये आणखी तीन दिवस वाढ करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला असून सर्व सरकारी आणि खासगी आस्थापने सोमवारपासून 25 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आपण आवाहन करत आहे. 

राज्याच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या असून केवळ जीवनावश्यक मालवाहतुकीस मुभा देण्यात आली आहे. यामुळे, परराज्यातील येणारे पर्यटक बंद झाले असून रेल्वेसेवा बंद आहेत. राज्यात नियंत्रीत विमान वाहतूक सेवा सुरू ठेवण्यात आली असून दाबोळी विमानतळावर उतरणार्‍या प्रत्येक प्रवाशांचे स्क्रिनिंग केले जात आहे. 

राज्यात रविवारी लागू करण्यात आलेल्या ‘जनता कर्फ्यू’ला 100 टक्के प्रतिसाद दिल्याबद्दल आपण गोमंतकीयांचे आभार मानत आहे. ही खूप चांगली गोष्ट असून राज्यात अजूनपर्यंत एकही ‘कोरोना व्हायरस’चा एकही बाधित रुग्ण नाही. यापुढेही राज्यात संसर्ग होऊ नये म्हणून रविवारी रात्री 9 नंतरही ‘जनता कर्फ्यू’ 25 तारखेपर्यंत राज्यभरात वाढवत आहे. गोमंतकीयांच्या सुरक्षिततेसाठी सरकारचा निर्णय सर्वांना मान्य असेल अशी आशा व्यक्त करून सर्वांकडून सहकार्याची अपेक्षा असल्याचे सावंत म्हणाले. 

लोकांनी राज्यातील पोलिस, आरोग्य आणि अन्य प्रशासकीय अधिकार्‍यांना सहाय्य कायम ठेवावे, असे आपण आवाहन करत आहे. परराज्यात शिक्षण अथवा रोजगारासाठी गेलेले अनेक मूळ गोमंतकीय राज्यात परतले असून त्यांनी आपली आरोग्य चाचणी करून स्वत:हून घरात राहून विलीगीकरणाचे पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.