Tue, May 26, 2020 08:07होमपेज › Goa › कोरोनासंदर्भात सर्वपक्षीय सल्‍लागार समिती स्थापन करा

कोरोनासंदर्भात सर्वपक्षीय सल्‍लागार समिती स्थापन करा

Last Updated: Mar 31 2020 10:31PM
पणजी ः पुढारी वृत्तसेवा

जगभरात कोरोना विषाणूंचा प्रसार वाढत चाललेला असून बड्या देशांना त्यावर नियंत्रण मिळविणे कठीण बनत चालले आहे. गोवा हे छोटे राज्य असले तरी लोकांची सुरक्षा  हे सरकारचे कर्तव्य आहे. कोरोनाच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नेत्यांची सल्लागार समिती स्थापन करावी अशी मागणी फातोर्डाचे आमदार तथा गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी केली आहे. 

देशात लॉकडाऊनचा आज सातवा दिवस असून जागतिक पातळीवर कोरोनाच्या विषाणूंचा प्रसार सुरू झाल्यापासून आतापर्यंत 7 लाख 85 हजार 807 कोरोनाचे पाझिटिव्ह रुग्ण सापडले असून 37 हजार 820 जणांचा मृत्यू झालेला आहे. देशात मंगळवारी दुपारी 1 वाजेपर्यंत 1 हजार 251 कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून 32 जणांचा मृत्यू झालेला आहे. गोव्यात कोरोनाचे 5 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. नशिबाने अजूनपर्यंत एकाचाही मृत्यू झालेला नाही, असे सांगून सरदेसाई म्हणाले, की देशभरातील कोरोनाच्या प्रसाराचा आढावा घेतला असता दिवसेंदिवस कोरोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत भर पडत असताना दिसत आहे.

इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या संशोधनानुसार देशातील लॉकडाऊनच्या कालावधी संपायला अजून 14 दिवसांचा अवधी असून त्या काळात कोरोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णांचा शंभरचा आकडा एक हजाराचा पल्ला गाठण्याची शक्यता आहे. वैद्यकीय सुविधा, यंत्रणा व तांत्रिक वैद्यकीय सुविधा विकसित असलेल्या देशांना कोरोनाला आळा घालण्यास कठीण होताना दिसत आहे. आपल्या देशात तशी विकसित वैद्यकीय यंत्रणा नसून कोरोनाच्या रुग्णांची केलेली चांचणीबद्दल साशंकता आहे.

देशभरात आतापर्यंत 38,432 जणांची तपासणी करण्यात आलेली आहे. जर्मनीमध्ये एका आठवड्यात 5 लाख लोकांची तपासणी करण्यात आली आहे. तर कोरिया मध्ये दरदिवशी 10 हजार लोकांची तपासणी केली जाते. याचा अर्थ आपल्या देशात मंद गतीने लोकांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. गोव्यात आतापर्यंत किती लोकांची तपासणी केली, याबद्दलची माहिती मिळत नाही. सरकारने या सर्व गोष्टींकडे लक्ष देऊन गोव्यात सर्वपक्षीय नेत्यांची सल्लागार समिती स्थापन करण्याची गरज आहे, असे विजय सरदेसाई यांनी सांगितले.

राज्य सरकार दबावाखाली कार्यरत असून कडक धोरण व सक्षम निर्णय घेण्यास सपशेल कमी पडलेले आहे.आपत्कालीन आरोग्य सेवा पुरविण्यासही सरकार कमी पडताना दिसते. सत्ताधारी भाजप पक्षातील 30 आमदार वेगळ्या बैठका घेऊन कोरोनाच्या नियंत्रणाबाबत त्यांच्यापुरते निर्णय घेतात. या आपत्कालीन काळात सरकार विरोधी गटातील आमदारांना विश्वासात घेत नाहीत. त्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या  सल्लागार समितीची गरज आहे, असे सरदेसाई यांनी सांगितले.