Thu, May 28, 2020 07:47होमपेज › Goa › मतदारसंघाच्या विकासासाठीच भाजपात प्रवेश

मतदारसंघाच्या विकासासाठीच भाजपात प्रवेश

Published On: Oct 20 2018 1:44AM | Last Updated: Oct 20 2018 1:44AMपणजी : प्रतिनिधी

काँग्रेसमध्ये राहून आपल्या मतदारसंघाचा  अपेक्षित विकास होत नसल्याचे जाणवल्याने मतदारसंघाच्या विकासासाठी आणि मतदारांच्या रोजगारादी अपेक्षांची पूर्ती करण्यासाठी  काँग्रेसचा त्याग करून भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचे मांद्रे व शिरोडा मतदारसंघाचे माजी आमदार अनुक्रमे  दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर  यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.  खाणबंदी, रोजगार आदी प्र्रश्‍न प्रलंबित असून त्यांच्या सोडवणुकीची क्षमता व धोरण काँग्रेसकडे नसल्यानेच आपण भाजपात गेल्याचेही त्यांनी सांगितले.

शिरोडकर म्हणाले की, आपण गेली 32 वर्षे काँग्रेसमध्ये राहिलो असून गेल्या 18 महिन्यांत ढिसाळ कारभाराला वैतागून आपण  काँग्रेसचा त्याग केला. काँग्रेसमध्ये कुठल्याही विषयावर एकजूट आणि एकमत होत नाही. शिरोडा मतदारसंघाचा विकास खुंटल्याचे जाणवले. राज्याच्या बेरोजगारी, खाणबंदी, विकास, आर्थिक अडचण आदी प्रश्‍नांबाबतीत  काँग्रेसकडे कोणतेही धोरण आणि तोडगाही नसल्याचे आढळून आले. पर्यटन क्षेत्रात प्रगती झाली असून  वर्षाला 1 कोटी पर्यटक येण्याची शक्यता आहे. मात्र, त्यासाठी आवश्यक साधनसुविधा व विकासकामे फक्त भाजप सरकार केंद्रात आणि राज्यात असले तरच होणार असेही लक्षात आले. शिरोडा मतदारसंघाच्या भल्यासाठी आपण काँग्रेसचा त्याग केला असून आपले पाऊल चुकीचे पडलेले नाही, असा  आपल्याला विश्‍वास आहे. 
मांद्रेचे माजी आमदार दयानंद सोपटे म्हणाले की, आपण स्वगृही परत आलो असून आपण उशिराने का होईना भाजपाची परतण्याची ‘ऑफर’ स्वीकारली आहे. आपण गेली 19 वर्षे राजकारणात असून गेल्यावर्षी विधानसभा  निवडणुकीनंतर विश्‍वजित राणे यांनी आपल्याबरोबर भाजपात प्रवेश करण्यास सांगितले होते. त्यावेळी आपल्याला निवडून दिलेल्या मतदारांचा विश्‍वासघात करू नये, या विचाराने मागे राहिलो. मात्र, मागील 18 महिने काँग्रेसला तीनवेळा सत्ता स्थापण्याची संधी येऊनही त्याचा  लाभ घेता आला नाही. काँग्रेसमध्ये नेता कोण, यावर शेवटपर्यंत एकमत होत नसल्याने त्यांना सरकार बनवता आले नाही. पेडणे हा मागासलेला व काबाडकष्ट करणार्‍या सामान्य  लोकांचा मतदारसंघ असल्याने भाजप सरकारने गत दीड वर्षात 32 कोटी रूपयांची विकासकामे राबवली आहेत. तसेच आपल्याला लहानमोठ्या अशा 103 रोजगार संधी देण्यात आल्या असून  विरोधक असूनही जर असा विकास होत असेल, तर सत्तेत सामील झाल्यास काहीही हरकत नसल्याचे आपले मत झाले. यामुळे आपण पेडणे मतदारसंघाच्या भल्यासाठी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. 

दरम्यान, बहुजन समाजाचे नेतृत्व करणारे आणि तळागाळातील कार्यकर्त्याशी संपर्क असलेले दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर हे  दोन काँगे्र्रसचे नेते भाजपमध्ये सामील झाले असून त्यांच्यामुळे मांद्रे आणि शिरोडा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष बलवान बनल्याचा विश्‍वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी व्यक्त केला. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दीड वर्षापूर्वी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली  भाजप आघाडीचे सरकार स्थापन करून स्थिर शासन देण्याचे आश्‍वासन दिले होते. हे आश्‍वासन भाजप पूर्ण करणार असून पाच वर्षांचा कार्यकाल विद्यमान सरकार पूर्ण करणार आहे, असेही ते म्हणाले.

जमिनीच्या व्यवहारात काळेबेरे नाही : शिरोडकर

शिरोडा गावातील सुमारे 1.84 लाख चौरस मीटर जमीन आपण 2006 साली एका बँकेकडून कर्ज काढून विकत घेतली. या जमिनीमुळे आपल्याला फायदा होऊ नये या हेतूने माजी भाजप आमदार महादेव नाईक यांनी सरकारला हाताशी धरून ती संपादन केली. मात्र, या भू संपादन प्रकरणी न्यायालयाने आपल्या बाजूने निकाल दिल्याने सरकारला आपल्याला जमिनीचा कायदेशीररीत्या ठरलेला दर द्यावा लागला. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या जमिनीचे आपल्याला 70 कोटी रुपये सात वर्षांच्या कालावधीत देण्याचे आश्‍वासन दिले आहे. आपल्या हक्काचे पैसे आपल्याला मिळाले असून या व्यवहारात काहीही काळेबेरे नाही, असा खुलासा सुभाष शिरोडकर यांनी केला.