Wed, May 27, 2020 06:01होमपेज › Goa › न्यायालयांमधील रिक्त पदे सहा महिन्यांत भरणार

न्यायालयांमधील रिक्त पदे सहा महिन्यांत भरणार

Published On: Jan 31 2019 1:30AM | Last Updated: Jan 30 2019 11:13PM
पणजी : प्रतिनिधी 

राज्यातील विविध न्यायालयांमधील रिक्त पदे सहा महिन्यांत भरली जातील, असे आश्‍वासन कायदा मंंत्री नीलेश काब्राल यांनी बुधवारी विधानसभेत प्रश्‍नोत्तर तासात दिले.
वेळ्ळीचे आमदार फिलीप नेरी रॉड्रिग्स यांनी विविध न्यायालयांमधील कर्मचारी कमतरतेबाबत  विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना कायदा मंत्री काब्राल यांनी ही वरील माहिती दिली.

आमदार रॉड्रिग्स म्हणाले, की राज्यातील विविध जिल्हा सत्र न्यायालये तसेच प्रथमवर्ग  न्यायदंडाधिकारी न्यायालयांमध्ये सुमारे 108 पदे रिक्त आहेत. सदर पदे रिक्त असल्याने दैनंदिन कामावर परिणाम होत आहे. याशिवाय येत्या काही महिन्यांत आणखीन कर्मचारी सेवानिवृत होती. अशा स्थितीत तेथील कामे कशी होणार,असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.

कायदा मंत्री काब्राल म्हणाले, की विविध न्यायालयांमधील कर्मचार्‍यांची कमतरता असली तरी ती भरुन काढण्यासाठी रोजगार भरती सोसायटीच्या मार्फत तात्पुरत्या  पध्दतीवर 29 कनिष्ठ लिपिकांची नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायालयांमधील रोजच्या कामांवर परिणाम होऊ नये, यासाठी त्यांना तात्पुरता कर्मचारी वर्ग देण्यात आला आहे. कायमस्वरुपी कर्मचार्‍यांची नियुक्ती व्हायची आहे. 2016 साली सरकारकडून नोकरभरतीवर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे नोकरभरती होऊ शकली नाही. नोकरभरतीवरील ही बंदी काही महिन्यांपूर्वीच उठवण्यात आली आहे. येत्या सहा महिन्यांत सर्व रिक्त पदे भरली जातील, असे आश्‍वासन त्यांनी दिले.