Wed, Jul 08, 2020 13:37



होमपेज › Goa › सिंपाल गावात अकरा महिलांना स्तनाचा कर्करोग

सिंपाल गावात अकरा महिलांना स्तनाचा कर्करोग

Published On: Jul 04 2019 1:57AM | Last Updated: Jul 04 2019 12:18AM




मडगाव : प्रतिनिधी 

कुठ्ठाळी मतदारसंघातील सांकवाळच्या सिंपाल या गावात तब्बल तेरा महिलांना स्तनाचा कर्करोग झाल्याचा प्रकार समोर  आहे. या तेरा महिलांपैकी दोन महिलांचा मृत्यू झाला असून अन्य अकरा महिलांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य खात्याने ताबडतोब या प्रकाराची चौकशी करून उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी सिंपालवासीयांनी केली आहे.

स्तनाचा कर्करोग हा गंभीर आजार असून महिलांना या आजाराबाबत वेळेत माहिती प्राप्त व्हावी,   वेळेवर त्यावर उपचार घेता यावेत, याकरिता सरकार अनेक उपक्रम राबवत आहे.जनजागृती मोहीम राबवूनही एकाच गावात स्तन कर्करोगाचे तब्बल तेरा रुग्ण आढळून आल्याने गावात हा चर्चेचा विषय बनलेला आहे. कर्करोग झालेल्या सर्व महिला मध्यम ते ज्येष्ठ अशा वयोगटातील आहेत. मागील काही वर्षांत दोन महिलांचा या आजाराने दुर्दैवी अंत झाला आहे. 

आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी या गंभीर आजाराची कारणे शोधण्यासाठी वैद्यकीय अधिकार्‍यांचे पथक नेमावे, अशी मागणी स्थानिक महिलांनी केली आहे. सविस्तर माहितीनुसार ज्या अकरा महिला सध्या स्तन  कर्करोगाने ग्रस्त आहेत त्यांचावर सांकवाळ आणि वास्को भागातील विविध इस्पितळात उपचार सुरू आहेत.

सिंपाल येथील समाजसेविका अर्चना  नाईक यांनी सांगितले,  अकरा महिला सध्या स्तन कर्करोगाने आजारी आहेत. एकाच गावात एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्करोगाचे रुग्ण सापडणे हा गंभीर प्रकार असून त्याची चाचणी होणे अत्यंत गरजेचे आहे. आम आदमी पक्षाचे प्रवक्‍ते सिध्दार्थ कारापूरकर यांनी पुढारीशी बोलताना सांगितले,की आपण स्वतः गावात जाऊन महिलांशी चर्चा केली आहेे.  जून महिन्यात येथील लोकांनी स्थानिक आमदार एलिना साल्ढाणा यांना पत्र पाठवून गावांतील महिलांना कर्करोग झाल्याची माहिती दिली होती. या निवेदनावर पंचावन्न महिलांनी  स्वाक्षर्‍या सुद्धा केल्या होत्या. सरकारने हा विषय आता गांभीर्याने घ्यावा ,अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

 कारणे शोधण्याची सूचनाः एलिना साल्ढाणा
कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्ढाणा यांनी सांगितले, की कर्करोगाचा विषय आपण आरोग्य संचालक जुजे डीसा यांच्यापर्यंत पोचवला आहे. तसेच कुठ्ठाळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी सुकोरो क्वाद्रोस यांना चौकशी करावी, अशी सूचना दिली आहे. आपण चौकशीचे आदेश दिल्यानंतर कर्करोगाची कारणे शोधण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, असेही त्या म्हणाल्या. प्रत्येक घरात भेट देऊन आरोग्य खात्याकडून चाचणी केली जात आहे.आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनाही कल्पना देण्यात आलेली आहे. लवकरच सिंपाल भागात कर्करोगासाठी विशेष वैद्यकीय शिबिर घेतले जाणार आहे.