होमपेज › Goa › उद्योगांच्या वीज समस्या सोडवण्यासाठी ७०० कोटींचा आराखडा : मडकईकर

उद्योगांच्या वीज समस्या सोडवण्यासाठी ७०० कोटींचा आराखडा : मडकईकर

Published On: Nov 15 2017 1:47AM | Last Updated: Nov 14 2017 11:42PM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

राज्यातील उद्योग व्यवसायापुढे असलेली वीज समस्या सोडवण्यासाठी सुमारे 700 कोटी रुपये खर्चाचा विकास आराखडा सरकारला सादर करण्यात येणार आहे. जुने ट्रान्स्फॉर्मर-कंडक्टर बदलणे, रस्त्यावरील  वीजपुरवठा  सुरळीत करणे आणि राज्यातील तीन ठिकाणी 220 केव्ही सब स्टेशन उभारणे अशी तीन टप्प्यात उपाययोजना हाती घेतली जाणार आहे, असे वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांनी सांगितले.

पवर्र्री येथील सचिवालयातील सभागृहात अखिल गोवा उद्योजक संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी वीजमंत्री मडकईकर यांची मंगळवारी भेट घेतली. त्यासंबंधी पत्रकारांना माहिती देताना ते म्हणाले की, मागील अनेक वर्षांच्या विजेच्या समस्या एका झटक्यात सोडवणे शक्य नाही. मात्र, तीन टप्प्यात सोडवण्याबाबत सरकार विचार करत असून त्यासाठी मजबूत साधनसुविधा  निर्माण करणे गरजेचे आहे. यासाठी तुये, साळगाव व वेर्णा औद्योगिक वसाहतीत जुन्या 110 केव्हीच्या जागी  220  केव्ही सब स्टेशन उभारणे, जुने ट्रान्स्फॉर्मर-कंडक्टर बदलणे, भुयारी वीजवाहिन्यांचे जाळे पसरणे आदी कामे हाती घेतली जाणार आहे. यासाठी 700 कोटी रुपयांचा विकास आराखडा खात्याने तयार केला असून आता मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याबरोबर घेतल्या जाणार्‍या बैठकीत त्याबाबत विचारविनिमय केला जाणार आहे. 

उद्योजक संघटनेचे अध्यक्ष राजकुमार कामत यांनी सांगितले, की राज्यातील उद्योगांना वीजपुरवठ्याबाबतच्या समस्या समजण्यासाठी उत्तर गोव्यातील औद्योगिक वसाहतीच्या प्रतिनिधींची वीजमंत्र्यांनी याआधी भेट घेतली होती. दक्षिण  गोव्यातील कुंकळ्ळी, सांकवाळ, वेर्णा, मडगाव, काकोडा आदी औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांनी मंगळवारी मडकईकर यांना भेटून समस्या मांडल्या. यामध्ये वारंवार वीज खंडीत होणे, कमी दाबाचा वीज पुरवठा होणे, जुने ट्रान्स्फॉर्मर व कंडक्टर बदलणे, जर्जर झालेल्या वाहिन्या बदलणे आदी मागण्या ठेवण्यात आल्या. वीजमंत्र्यांनी उद्योजक हे विकासाचे महत्वाचे  घटक असल्याने त्यांच्या तक्रारी निवारण करण्याचे आदेश अभियंत्यांना दिले.  वीजमंत्र्यांचे हे स्वागतार्ह पाऊल आहे.