Sun, Dec 08, 2019 06:15होमपेज › Goa › गोवा डेअरीचे आठ संचालक अपात्र

गोवा डेअरीचे आठ संचालक अपात्र

Published On: Aug 14 2019 12:07AM | Last Updated: Aug 14 2019 12:07AM
पणजी : प्रतिनिधी

गोवा डेअरीच्या आठ संचालकांना मंगळवारी नाट्यमय घडामोडीत अपात्र ठरवण्यात आले. राज्याचे सहकार निबंधक मिनिनो डिसोझा यांनी काढलेल्या आदेशात या आठही संचालकांना अपात्र ठरवल्यामुळे गोवा डेअरीवरील संचालक मंडळाचा ताबा गेला आहे. अपात्र ठरवलेल्या आठ संचालकांत धनंजय देसाई, विठोबा देसाई, बाबूराव देसाई, नरेश मळीक, गुरुदास परब, माधव सहकारी, राजेंद्र सावळ व शिवानंद पेडणेकर यांचा समावेश आहे. गोवा डेअरीचा ताबा आता डॉ. विलास नाईक यांच्याकडे देण्यात आला असून त्यांची गोवा डेअरीचे प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

विलास नाईक प्रशासकपदाचा बुधवारी (दि. 14) ताबा घेणार असल्याची माहिती देण्यात आली. गोवा डेअरीतील गैरव्यवहारप्रकरणी या आठही संचालकांना अपात्र ठरवण्यात आले आहे. यापूर्वीही अपात्रतेचे प्रकरण घडल्यानंतर संचालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण त्यानंतर अपात्रता रद्द करून निलंबित केलेले गोवा डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. नवसू सावंत यांना पुन्हा एकदा निलंबन रद्द करून गोवा डेअरीचा ताबा देण्यात आला होता. गेल्या मे मध्ये नवसू सावंत निवृत्त झाल्यानंतर त्यांनी महिनाभर गोवा डेअरीचा ताबा सांभाळला होता, पण त्यानंतर काही दूध उत्पादकांनी उपोषण आंदोलन छेडल्यामुळे नवसू सावंत यांनी गोवा डेअरीचा पदभार सोडून ताबा लेखा अधिकारी राधिका काळे यांच्याकडे दिला होता. आता पुन्हा एकदा आठ संचालकांना अपात्र ठरवून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.