Mon, May 25, 2020 09:42होमपेज › Goa › गोवा : कोरोनामुळे दहावी बोर्डाची परीक्षा पुढे ढकलली

गोवा : कोरोनामुळे दहावी बोर्डाची परीक्षा पुढे ढकलली

Last Updated: Apr 14 2020 1:04AM
पणजी : पुढारी वृत्तसेवा

कोविड-१९ ह्या महामारीमुळे राज्यातील दहावी बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतलेला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व विद्यालयांतील शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहून त्यांना धीर द्यावा तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, असे आवाहन शिक्षण खात्याने सोमवारी जारी केलेल्या परिपत्रकाव्दारे केले आहे.

परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये पेचप्रसंग निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांना अशा प्रसंगात पालक तसेच शिक्षकांनी आधार देण्याची गरज आहे. त्यामुळे राज्यातील सर्व विद्यालयांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना आधार देण्यासाठी संबंधित शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहण्याविषयी सांगावे. तसेच विषयांच्या विभाग प्रमुखांना याची खात्री करून घेण्यास सांगावे, असेही परिपत्रकात सांगितले आहे.  

शिक्षकांनी आपआपल्या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रोनिक माध्यमांव्दारे संपर्क करावा. तसेच त्यांना अभ्यासात काही मदत हवी असल्यास आवश्यक मदत करावी, असे निर्देश शिक्षण खात्याकडून सर्व विद्यालयांना देण्यात आले आहेत. तसेच परीक्षेची तारीख निश्चित होताच, वेळापत्रक दहा दिवस अगोदर कळविण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे.