Thu, Jul 02, 2020 14:26होमपेज › Goa › गोव्यातील 124 खाणींचा मार्च 20 नंतर ई-लिलाव

गोव्यातील 124 खाणींचा मार्च 20 नंतर ई-लिलाव

Published On: Sep 24 2019 1:37AM | Last Updated: Sep 24 2019 1:37AM
पणजी : प्रतिनिधी

राज्यातील 184 खाणींच्या लिजचा कालावधी 31 मार्च- 2020 मध्ये संपुष्टात येत असून त्यानंतर यातील फक्त 124 खाणींच्या लिजचा ई-लिलाव करता येणे शक्य असल्याचे केंद्रीय मंत्रालयाच्या डॉ. के. राजेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आपल्या अहवालात जाहीर केले आहे. 

देशातील बहुतांश लोहखनिजाच्या खाणी 2020 मध्ये बंद पडणार असून गोवा, ओडिसा, कर्नाटकात राज्यातच अधिकतर लोह खनिज खाणी आहेत. या खाणी पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्र्यांच्या गटाने आपल्या अहवालात मार्च 2020 पर्यंत सर्व खाणींचे लिज ई-लिलावाद्वारे देण्यास सांगितले आहे. या गटाला राव समितीने नुकताच सदर अहवाल सादर केला आहे. 

राव समितीच्या अहवालात म्हटले आहे की, देशातील सुमारे 334 खाणींचा कालावधी 31 मार्च 2020 पर्यंत संपुष्टात येत आहे. यातील 77 खाणी अशा आहेत, की जिथे खनिज व्यवसाय कधीच सुरू झालेला नाही. तर 47 लिजेस अशा आहेत, जिथे फक्त काही कालावधीसाठी खनिज उत्खनन झाले होते. याशिवाय, 60 लिज क्षेत्रे ही राष्ट्रीय उद्यानाच्या अथवा अभयारण्याच्या हद्दीत अथवा ‘बफर झोन’मध्ये येत असल्याने त्या कधीच खाण व्यवसाय करू शकणार नाहीत. याविषयी वन कायदे खूप कडक असून पर्यावरणप्रेमींनी संवेदनशील क्षेत्रात खाण उत्खननाला कडक विरोध केला आहे. 
अहवालात म्हटले आहे की, गोव्यात 2007 ते 2012 या कालावधीत फक्त पाच खाणी, तर 2015 ते फेब्रुवारी-2018 या काळात एकच खाण कार्यरत होती. या सर्व खाणींची मुदतही मार्च-2020 मध्ये संपुष्टात येते. 

सर्वाधिक खाणी गोव्यात

देशभरात सुमारे 334 लोहखनिजाच्या खाणी सुरू असून त्यात गोव्यात सर्वाधिक 184 खाणी आहेत. गोव्यानंतर कर्नाटक (50), ओडिसा (31), झारखंड (21) व अन्य राज्यांचा क्रमांक लागतो. या सर्व खाणींची मुदत 2020 साली संपल्यानंतर लिलावात काढण्यासाठीची प्रक्रिया सप्टेंबर 2019 मध्ये सुरू करण्याची सूचना करण्यात आली आहे.