Thu, May 23, 2019 22:15
    ब्रेकिंग    होमपेज › Goa › कुडचडे येथे कप्लिगं तुटले; कामराळवासीयांचे हाल

मालगाडीचे चाळीस डबे राहिले मागे

Published On: Jun 14 2018 1:33AM | Last Updated: Jun 14 2018 1:33AMमडगाव : प्रतिनिधी 

वास्कोतून होस्पेट (कर्नाटक) कडे कोळसा घेऊन जाणार्‍या मालवाहू रेल्वेचा सांधा (कप्लिगं) कामराळ कुडचडे येथे दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास तुटल्याने चाळीस डबे इंजिनापासून अलग होऊन मागे राहिले. रेल्वेचे इंजिन आणि चाळीस डबे रुळावर अडकून राहिल्याने कामराळ येथील लोकांना रुळ ओलांडण्यासाठी कसरत करावी लागली.

कुडचडे रेल्वे स्थानकावरून 11.30 वाजण्याच्या  सुमारास कोळशाचा साठा घेऊन मालवाहू रेल्वे होस्पेटकडे निघाली होती. पुढे कुळे रेल्वे स्थानकावर थांबा घेऊन व इंजिन लावून ही मालवाहू गाडी पुढे जाणार होती. पण त्यापूर्वीच कामराळ येथे वळणावर अचानक डब्यांना जोडणारा सांधा तुटल्याने सुमारे चाळीस डबे मागे राहिले व इंजिनचा भाग पुढे गेला. शेवटचे काही डबे मागे राहिल्याचे कळताच चालकाने इंजिन थांबविले. अचानक  सांधा तुटल्याने मागे राहिलेले डबे ऑटोमॅटिक ब्रेक सिस्टीममुळे जागेवर थांबले. या मार्गावरून वास्को ते निजामुद्दीन व अन्य प्रवाशी व मालवाहू ट्रेन्स ये-जा करीत असल्याने लवकरात लवकर मालवाहू ट्रेन दुरुस्त होऊन त्या मार्गावरून पुढे जाणे गरजेचे होते. शिवाय दुर्घटना झालेल्या ठिकाणी अन्य वाहन जाऊ शकत नव्हते.

रेल्वे कर्मचार्‍यांकडील  सुमारे सत्तर किलो वजनाचा अतिरिक्‍त सांधा  स्थानिकांच्या मदतीने  दुचाकीवर टाकून घटनास्थळी पोहोचविण्यात आला. सुमारे एक तासांच्या प्रयत्नानंतर सांधा बदलण्याचे काम पूर्ण झाले. पण या दरम्यान कामराळ येथील लोकांना रूळ ओलांडून आपापल्या घरी जाण्यास बरीच कसरत करावी लागली. रेल्वे रुळाच्या पलीकडे सुमारे सत्तर घरे असून अद्याप रस्ता  बांधकाम न झाल्याने लोकांना रूळ ओलांडूनच घरी जावे लागते. रेल्वेकडून पावसाचे पाणी जाण्यासाठी एक नाला खोदून त्यावर छोटा पूल बांधला होता. त्यावरून लोक आपल्या घरी ये-जा करीत आहेत.

कामराळ येथील नारायण नाईक यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना सांगितले, की रेल्वे रूळावरून जाण्यास अडथळा निर्माण झाल्यास नाल्यातून ये-जा करावी लागत आहे. रात्री अपरात्री महिलांना ये-जा करण्यास फार अडचण होते. रेल्वे रुळाच्या दुपदीकरणाच्या कामांसाठी साहित्य आणून टाकल्याने पूर्वीप्रमाणे रेल्वे रूळ ओलांडून जाता येत नाही.सरकार कडून भूयारी मार्ग उपलब्ध  करून देण्यात येणार होते, मात्र त्याची पूर्तता अद्याप झालेली नाही.