Mon, May 25, 2020 14:05होमपेज › Goa › दिग्विजय सिंह यांच्यामुळेच राज्यात काँग्रेस सत्तेपासून दूर

दिग्विजय सिंह यांच्यामुळेच राज्यात काँग्रेस सत्तेपासून दूर

Published On: Feb 20 2019 1:35AM | Last Updated: Feb 20 2019 12:28AM
मडगाव : प्रतिनिधी

2017 च्या विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष या नात्याने सरकार स्थापनेसाठी आपण राज्यपाल मृदुला सिन्हा यांना पत्र देणार होतो, पण अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह  यांनी आपल्याला अडविल्यामुळे सरकार स्थापनेची संधी काँग्रेसला मिळू शकली नाही, असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री तथा नावेलीचे आमदार लुईझिन फालेरो यांनी नावेलीत पत्रकारांशी बोलताना केला.   सिंह यांच्यामुळेच राज्यात काँग्रेस सत्तेत येऊ शकले नाही, असे  सांगून आमदार फालेरो यांनी काँग्रेसमधील अंतर्गत वादाला वाट मोकळी करून दिली आहे. 

आमदार फालेरो यांच्या या विधानामुळे काँग्रेस पक्षात खळबळ माजली आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला बहुमत मिळाले होते. त्यामुळे सरकार स्थापनेसाठी आपण निकालादिवशीच्या रात्रीच राज्यपाल मृदुला सिन्हा यांना पत्र  सादर करण्याची तयारी  चालवली होती. पण दिग्विजय सिंह यांनी आपल्याला सरकार स्थापनेचे पत्र देण्यापासून अडवून ठेवले, असे फालेरो यांनी सांगितले. आपल्याला सरकार स्थापन करण्यापासून रोखण्यात आल्याने त्याचा निषेध म्हणून आपण  पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामाही दिला होता, असेही फालेरो  म्हणाले.

आपल्याकडे विरोधी पक्षनेतेपदासाठी आलेला प्रस्तावही आपण उपरोक्त घटनेमुळे फेटाळल्याचे फालेरो यांनी सांगितले. आपण विरोधी पक्षनेतेपदी यावे, असे काँग्रेसच्या बहुतांश आमदारांना  वाटत  होते. जास्तीतजास्त आमदार आपल्या बाजूने होते, तरी आपण तो प्रस्ताव फेटाळून लावला. दिग्विजय सिंह यांच्यामुळेच भाजपला अल्पमतात असूनसुद्धा सरकार स्थापन करण्याची संधी प्राप्त झाली. 24 तासांच्या आत सरकार स्थापन करणार, असे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले होते. आता 24 महिने होऊन गेले  तरीही सरकार स्थापन झालेले नाही, अशी टीका करून लुईझिन फालेरो यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. सिंह यांच्यामुळे आम्हाला सरकार स्थापन करता आले नाही.म्हणून आपण पक्षाच्या अंतर्गत कामात हस्तक्षेप केला नाही आणि पुढेही करणार नाही, असे फालेरो म्हणाले. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना, आपण लोकसभा निवडणूक लढवणार नाही आणि आपण त्यासाठी प्रयत्नही केलेले नाहीत, असे आमदार फालेरो म्हणाले. 

नावेली येथे रस्ता डांबरीकरण कामाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नावेली पंचायतीच्या सरपंच विल्मा डिसिल्वा, पंचायत सदस्य   उपस्थित होते.