Tue, May 26, 2020 05:11होमपेज › Goa › हरमल,बेंगळुरूत ७६ लाखांचा ड्रग्ज साठा जप्त

हरमल,बेंगळुरूत ७६ लाखांचा ड्रग्ज साठा जप्त

Last Updated: Mar 23 2020 10:09PM
पणजी : पुढारी वृत्तसेवा

तुर्किस्तानातून थेट गोव्यासह कर्नाटक व केरळच्या राज्यात  एमडीएमए व एलएसडी  ड्रग्जचा पुरवठा करणार्‍या आंतरराज्य टोळीचा गोवा अंमली पदार्थ प्रतिबधक विभाग पोलिस व बेंगळूरच्या केंद्रीय गुप्तचर विभाग व अंमलीपदार्थ प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी पर्दाफाश केला. खालचावाडा-हरमल व बेंगळुरू येथे शनिवारी केलेल्या संयुक्त कारवाईत तुर्कीचे माजी कमांंडो मुरत ताज (47), महमद फैय्याज (27) व रशिद (29)  या  तिघांना अटक करून त्यांच्याकडील 76 लाख रूपये किंमतीचा ड्रग्ज साठा जप्त केला.  . 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महमद फैय्याज व रशिद हे दोघे केरळीयन युवक असून पेशाने संगीतकार आहेत. ते दोघे संगीत रजनीच्या रेव्ह पार्टीत विदेशी नागरिकांना गाठून त्यांना  ड्रग्जचा पुरवठा करीत असल्याचे पोलिस तपासात आढळून आले आहे. 

गोव्याच्या अंमलीपदार्थ प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी गेल्या 7 फेब्रुवारी 2020 रोजी खालचावाडा-हरमल येथे छापा टाकून   71 लाख रूपये किंमतीचा ड्रग्ज साठा जप्त केला होता. तर 21 मार्च रोजी बेंगळूरच्या केंद्रीय अंमलीपदार्थ प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी महमद फैय्याज व रशिद यांच्या ठिकाणांवर छापे मारून त्यांच्याकडील   5 लाख रूपये किंमतीचे ड्रग्ज जप्त केले. 

मुरत ताज हा तुर्किस्तानचा माजी कमांडो असून भारतात येऊन   दर्जात्मक अंमलीपदार्थांच्या पुरवठ्याचे आंतरराज्य जाळे पसरविणारा प्रमुख संशयित आहे. त्याने गोव्यात खालचावाडा-हरमल येथे वास्तव्य केले होते. नंतर त्याने स्थानिक युवकांच्या मदतीने गोव्यासह कर्नाटक व केरळ मध्ये  ड्रग्ज पुरवठ्याचे जाळे  विनले.  

संशयित  मुरत ताज पर्यटनाच्या निमित्ताने पर्यटन स्थळांना भेटी देऊन विदेशी नागरिकांवर लक्ष केंद्रीत करून ते एमडीएमए व एलएसडी या ड्रग्जचा पुरवठा करीत असे. केरळचे महमद फैय्याज हे पेशाने ध्वनीसंकलक असून रशिद हे रेव्ह पार्ट्यांचे डीजे कलाकार आहेत. पर्ययटन स्थळांवर आयोजित केल्या जाणार्‍या रेव्ह पार्ट्यांत मुरत ताजची त्या दोघांशी ओळख झाली. रेव्ह पार्ट्यांत विदेशी नागरिकांना  ड्रग्ज पुरवण्यासाठी त्याने केरळच्या संगीतकारांना मोठ्या रकमेची आमिषे दाखविली. ते दोघे संगीतकार     रेव्ह पार्ट्यांमध्ये कार्यक्रम करीत होते. नंतरच्या काळात रेव्ह पार्ट्यांमधून एमडीएमए व एलएसडी या दर्जात्मक अंमलीपदार्थांचा विक्री व्यवहार त्यांच्याकडून सुरू करण्यात आला होता. गोव्यासह कर्नाटक व केरळमधील पर्यटनांच्या स्थळी मोठ्या प्रमाणात अंमलीपदार्थांचा व्यवहार झाल्याचे पोलिस तपासात आढळून आले आहे. या कारवाईसाठी पोलिसांनी तांत्रिक देखरेखीचा वापर केलेला आहे.

गोव्याच्या अंमलीपदार्थ प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक सुदेश वेळीप यांना गोव्यातून आंतरराज्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दर्जात्मक अंमलीपदार्थांचा पुरवठा होत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर गोवा पोलिसांनी निरीक्षक सुदेश वेळीप यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक शिताकांत नाईक, उपनिरीक्षक अरूण देसाई व सुशांत पागी यांनी खालचावाडा-हरमल येथे  मुरत ताजच्या भाडोत्री घरावर छापा  टाकून  71 लाख रुपये किंमतीच्या  ड्रग्जसह अटक केली. अंमलीपदार्थांच्या पुरवठ्याचे जाळे कर्नाटकात पसरल्याची माहिती मिळाल्यानंतर बेंगळूरच्या केंद्रीय गुप्तचर विभागाचे आयुक्त कुलदीप जैन व गोवा अंमलीपदार्थ प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक शोभित सक्सेना यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली बेंगळूरचे पोलिस निरीक्षक विरूपाक्ष स्वामी यांच्या पथकाने ही कारवाई करून अंमलीपदार्थांच्या व्यवहारात गुंतलेल्या दोघा केरळीयन युवकांना अटक केली. 

या अंमलीपदार्थ पुरवठ्याच्या आंतरराज्य टोळीत आणखी बरेच  स्थानिक युवक गुंतलेले आहेत. त्या अनुषंगाने पोलिस पथके तपास करीत आहेत.