Thu, Jul 02, 2020 14:06होमपेज › Goa › बाबूशना उमेदवारी ही घोडचूक

बाबूशना उमेदवारी ही घोडचूक

Published On: Jul 12 2019 1:46AM | Last Updated: Jul 12 2019 12:15AM
मडगाव : प्रतिनिधी

बाबूश मोन्सेरात यांना पणजी विधानसभा पोटनिवडणुकीची उमेदवारी देऊन पक्षाने घोडचूक केली आहे. काँग्रेसच्या आमदारांना भाजपची वाट दाखवण्याच्या कारस्थानाचे बाबुश मोन्सेरात हेच मुख्य सूत्रधार आहेत, अशा शब्दांत काँग्रेसचे गोवा प्रभारी डॉ. चेल्लाकुमार यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. दहाही फुटिर आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी सभापतींसमोर याचिका दाखल केली जाणार आहे, आणि त्यानंतर न्यायालयातही धाव घेतली जाणार आहे, अशी माहिती डॉ. चेल्लाकुमार यांनी दिली.

येथील एका हॉटेलमध्ये चेल्लाकुमार पत्रकारांशी बोलत होते. आपण गोव्यात आल्या आल्या वकिलांशी चर्चा केली आहे. पक्ष सोडून गेलेल्या सर्व दहाही आमदारांच्या विरोधात अपात्रता याचिका दाखल करण्यासाठी सोपस्कार सुरू केले आहेत, 

अशी माहिती त्यांनी दिली. राजकिय कारणांसाठी आमदार पक्ष सोडून गेले असते तर आपण हस्तक्षेप करून त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता, पण हा विषय कोट्यवधी रुपयांचा आहे आणि त्यात आपण हस्तक्षेप करू शकत नाही. आमदारांना विकत घ्यायला पक्षाकडे पैसेही नाहीत, असे चेल्लाकुमार म्हणाले.

काँग्रेसला जुनी परंपरा आणि स्वतंत्र विचारधारा आहे. या पक्षातून निवडून आलेले आमदार पक्ष सोडून गेल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत, पण अशा घटनांमुळे पक्ष डगमगलेला नाही. या दहा जणांनी स्वतःची तत्वे बाजूला ठेवून पक्ष सोडलेला आहे. त्यांच्या जाण्याने पक्षाचे कोणतेही नुकसान होणार नाही, असे डॉ.चेल्लाकुमार म्हणाले. स्वतः बाबू कवळेकर यांनी दोन दिवसांपूर्वी आपल्याला फोन करून आगामी अधिवेशनात काँग्रेस पक्ष सत्ताधारी भाजप सरकारला घेरण्याची तयारी करत असल्याचे सांगितले होते. सर्वांना मेसेज पाठवून या संदर्भात बैठक घेण्याचे त्यांनी नियोजन केले होते. तो मेसेज आजही आपल्या मोबाईलवर आहे, अशी माहिती चेल्लाकुमार यांनी दिली.

बाबू कवळेकर व इतर नऊ आमदारांनी राजीनामा दिला म्हणून काँग्रेसचे काहीच नुकसान होणार नाही, पण त्यांच्या या भूमिकेला काँग्रेस पक्ष आव्हान देणार आहे. आपली कायदेतज्ज्ञांशी याबाबत चर्चा झालेली आहे. सर्वप्रथम सभापतींसमोर त्यांना अपात्र ठरवण्यासाठी अर्ज केला जाणार असून त्यानंतर न्यायालयात आव्हान देण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे, असे चेल्लाकुमार यांनी सांगितले.

पैशांच्या आमिषाने फोडाफोडी

भाजपने पैशांचे आमिष दाखवून दुसर्‍या पक्षाचे आमदार फोडण्याचे राजकारण सुरू केले आहे. त्यांनी यापूर्वी तेलंगणा आणि कर्नाटक राज्यात हेच केले होते. भाजपच्या पैशांच्या आमिषाला बळी पडूनच काँग्रेसचे दहा आमदार पक्ष सोडून गेले आहेत, असे  चेल्लाकुमार यांनी सांगितले. पक्ष सोडलेल्या आमदारांनी महिन्याभरापूर्वी आपल्याशी चर्चा करताना भाजपच्या काही नेत्यांकडून त्यांना कोट्यवधीची ऑफर आली आहे, असे सांगितले होते. आपण या आमदारांच्या संपर्कात होतो, पण त्यांना आपल्या मतदारांपेक्षा पैशाचे आमिष मोठे वाटले, असा आरोप करून आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष सर्वत्र नवीन उमेदवार उभे करणार आहे, अशी माहिती चेल्लाकुमार यांनी दिली.