Mon, May 25, 2020 11:15होमपेज › Goa › इफ्फी आयोजनाबाबत साशंकता

इफ्फी आयोजनाबाबत साशंकता

Last Updated: Apr 27 2020 12:48AM

संग्रहित छायाचित्रपणजी : पुढारी वृत्तसेवा 

कोरोना संसर्गाची भीती कायम असल्याने दरवर्षी होणारा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) यंदा होईल, की नाही याबद्दल संभ्रम आहे. आणखी दोन महिन्यात म्हणजेच जुलै महिन्यापर्यंत कोरोना जगभरातून नष्ट झाला, तसेच जगभरातील वाहतूक पूर्ववत झाली तरच यंदाचा इफ्फी नियोजित वेळेत होईल. स्थितीत बदल झाला नाही, तर इफ्फीचे आयोजन निश्चितच पुढे ढकलावे लागेल, असे गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई यांनी ‘ पुढारी’ शी बोलताना दिली. 

फळदेसाई म्हणाले की, सध्या कोरोनाने संपूर्ण जगावर आपला विळखा घातला असून अनेक देश कोरोनाच्या प्रकोपाला बळी पडले आहेत. कोरोनामुळे मृतांचा आकडाही अनेक देशांमध्ये वाढत आहे. त्यामुळे यंदाचा इफ्फी होईल, की नाही हे सध्या सांगणे कठीण आहे. जागतिक स्थिती लक्षात घेऊन तसेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनकडून परवानगी मिळाल्यास इफ्फी आयोजित करण्याबद्दल आम्ही विचार करू शकतो, असेही फळदेसाई यांनी सांगितले. 

देशासह जगभरात कोरोनाने हाहाकार माजविला आहे. त्यामुळे इफ्फी साजरा होणार की नाही याबद्दल निश्चितच साशंकता आहे. इफ्फी हा केवळ राज्यापुरता मर्यादित नसून या महोत्सवात जगभरातील सिने क्षेत्रातील दिग्गज आपल्या चित्रपटांसह सहभागी होतात. गतवर्षी 2019 मध्ये इफ्फीचे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले होते. या महोत्सवात सुमारे 80 पेक्षा अधिक देश सहभागी झाले होते. 

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसेच मनोरंजन संस्थेकडून सुमारे सहा महिने अगोदर इफ्फीची तयारी सुरू केली जाते. इफ्फीसाठीची प्रक्रिया मे ते जून महिन्यापासून सुरू होते. त्यासाठी अन्य देशांशी संपर्क साधला जातो व चित्रपटांची निवड, ज्युरीची निवड, त्यांचा प्रवास, राहण्याची सोय या सर्व प्रक्रियेला वेळ जातो. या वर्षी कोरोनामुळे सदर प्रक्रिया पूर्ण करून इफ्फी नोव्हेंबरपर्यंत आयोजित करणे कठीण आहे, असे फळदेसाई यांनी स्पष्ट सांगितले. 

इफ्फीचे आयोजन नोव्हेंबर महिन्यात करायचे असल्यास कोरोनावर लवकरात लवकर मात करणेही तितकेच महत्वाचे आहे. जुलै महिन्यापर्यंत सर्व देशांनी त्यावर नियंत्रण मिळविले व स्थिती पूर्ववत झाली तरच नोव्हेंबरपर्यंत इफ्फी शक्य आहे. मात्र, याप्रमाणे न झाल्यास महोत्सव पुढे ढकलावा लागेल अथवा तो रद्दही करावा लागू शकतो, असे फळदेसाई यांनी सांगितले.

अन्य चित्रपट महोत्सवही रद्द होण्याची शक्यता 

सद्यस्थिती पाहता इफ्फी प्रमाणेच गोवा मनोरंजन संस्थेचे अन्य महोत्सव देखील कोरोनामुळे रद्द होण्याची शक्यता आहे. युरोपियन चित्रपट महोत्सव, लुसोफोन चित्रपट महोत्सव, पोर्तुगीज चित्रपट महोत्सव हे महोत्सवही पुढे ढकलण्याची किंवा रद्दच होण्याची शक्यता आहे.