Mon, Sep 16, 2019 11:33होमपेज › Goa › हवेत चालणारी डबल डेकर गोव्यात आणणार

हवेत चालणारी डबल डेकर गोव्यात आणणार

Published On: Jan 28 2019 1:09AM | Last Updated: Jan 28 2019 1:09AM
पणजी : प्रतिनिधी

नवभारताची उभारणी करण्याचे महत्त्वाकांक्षी कार्य देशात सुरू झाले आहे.  विजेवर  धावणारी आणि हवेत चालणारी डबल डेकर बस आपण ऑस्ट्रियात पाहिली असून 260 प्रवासी क्षमतेची ती बस गोव्यात आणण्याचा आपला मानस आहे. गोव्यासारख्या छोट्या क्षेत्रफळाच्या व कमी लोकसंख्येच्या राज्यात ही बस उत्तम प्रकारे कार्यरत होऊ शकते. मेट्रोपेक्षा अधिक प्रवासी क्षमता असलेली, तसेच तुलनेने कमी खर्च असलेली ही बस गोव्याच्या पर्यटन व्यवसाय हिताच्या दृष्टीने खूपच उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. 

गोव्याचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मांडवी नदीवरील तिसर्‍या पुलाचे लोकार्पण रविवारी रात्री केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या तसेच मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीत नामफलकाचे अनावरण करून आणि समई प्रज्वलित करून शानदार सोहळ्यात करण्यात आले. सदर पुलाला माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले असून ‘अटल सेतू’ नामकरण करण्यात आल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी यावेळी जाहीर केले.

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी म्हणाले,  केंद्र सरकाने आजवर गोव्याच्या पायाभूत विकासकामांसाठी 15 हजार कोटींचा निधी  मंजूर केला आहे. याचे श्रेय गोमंतकीय जनतेलाच जाते. त्यांच्यामुळेच भाजपप्रणीत केंद्र सरकारला दोन खासदार मिळाले आहेत. गोव्याच्या आंतरराष्ट्रीय मोपा विमानतळाला व्हेनिसच्या धर्तीवर जलवाहतुकीद्वारे जोडण्याचे आपले स्वप्न होते, मात्र ते आपण सोडून दिल्याचे खेदाने म्हणावे लागत आहे. 

सुदिन ढवळीकर यांनी सांगितले की, 2019 हे वर्ष गोव्यासाठी भाग्याचे वर्ष आहे. 2017 मध्ये पायाभरणी केलेले 6 प्रकल्प यंदाच्या वर्षात पूर्ण होणार आहेत. त्यात डिसेंबर 2019 पर्यंत 2 हजार कोटी खर्चून उभारण्यात येत असलेल्या जुवारी पुलाची एक लेन खुली करण्यात येणार आहे. 

गोव्याला केंद्र सरकारकडून केवळ 90 कोटी रुपयांचा निधी विकासकामांसाठी मिळत होता. मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे गोव्याला हजारो कोटी रुपयांचा विकास निधी मिळत आहे.  
यावेळी केेंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, सभापती डॉ. प्रमोद सावंत, खासदार नरेंद्र सावईकर, खासदार विनय तेंडुलकर, पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर,  कृषिमंत्री विजय सरदेसाई, आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे, कला संस्कृती मंत्री गोविंद गावडे, जलस्त्रोत मंत्री विनोद पालयेकर, मंत्री रोहन खंवटे, माविन गुदिन्हो,  जीएसआयडीसी चेअरमन दीपक पाऊसकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी, केंद्रीय मंत्री गडकरी यांनी पणजी-चोडण पूल उभारण्यासही सहकार्य करावे, अशी मागणी केली.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी भाषणाची सुरूवात करताच उपस्थितांमध्ये जोश पसरला.  पर्रीकर म्हणाले, ‘अमेरिका इज रिच बिकॉज रोडस् आर गुड’ हे वाक्य बराच काळ  मनावर ठसले होते. आपण नितीनजींना हीरो म्हणून पाहतो. माजी पंतप्रधान स्व.अटलजींनी त्यांचे काम पाहून त्यांना महाराष्ट्रातून दिल्लीला नेले आणि देशाचा रोडमॅप तयार करण्याचे काम त्यांच्यावर सोपवले. गोव्यातील पाच वर्षात सुरू होऊन पूर्ण झालेला हा एकमेव पूल आहे. आम्ही पूल उभारतो, तो लोकांच्या पैशांवरच. गोव्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर, सिध्दार्थ कुंकळ्येकर, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर  यांच्या सहकार्यामुळेच उभारणे शक्य झाले.

विकास प्रकल्पांना विरोध करणे ही प्रवृत्ती झाली आहे, असे सांगून मुख्यमंत्री पर्रीकर यांनी पुलाच्या कामावर तसेच अन्य विकासकामांवर टीका करणार्‍यांचा समाचार घेतला. गोयंकारांनी पॉझिटीव्ह व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद भगत यांनी केले. माजी आमदार सिध्दार्थ कुंकळ्येकर यांनी आभार मानले. वंदे मातरम् गीताने सोहळ्याची सांगता झाली.