Wed, May 27, 2020 11:47होमपेज › Goa › ‘मगो’ला कुणीही डेडलाईन देऊ नये : दीपक ढवळीकर

‘मगो’ला कुणीही डेडलाईन देऊ नये : दीपक ढवळीकर

Published On: Mar 27 2019 1:51AM | Last Updated: Mar 27 2019 12:34AM
पणजी : प्रतिनिधी

भाजप आघाडी सरकारशी मगोची युती निवडणुकीआधी झालेली नसून, ती निवडणुकीनंतर झाली होती त्यामुळे मगो पक्षाला शिरोड्यातून उमेदवारी मागे घेण्याची ‘डेडलाईन’ कोणीही देऊ शकत नाही, अशा शब्दांत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांच्या विधानाचा  समाचार घेतला. सरकारचा घटक पक्ष या नात्याने मगोने शिरोडा पोटनिवडणुकीतून 28 मार्चपूर्वी माघार घ्यावी, या विनय तेंडुलकर यांच्या विधानाच्या पार्श्‍वभूमीवर ढवळीकर बोलत होते.

ढवळीकर म्हणाले, विधानसभा निवडणुकीआधी जर भाजप-मगो युती अस्तित्वात असती तर अध्यक्ष या नात्याने शिरोडा पोटनिवडणुकीत मगोचा उमेदवार उभा न करणे ही आपली जबाबदारी होती. मात्र, तशी स्थिती नसल्याने आपण शिरोडा पोटनिवडणुकीतून माघार घेण्याचा प्रश्‍नच नाही.काँग्रेसचे माजी आमदार राजीनामा देऊन त्यांच्या पक्षातून बाहेर पडले याचा अर्थ त्यांना आपण जिंकून येणार असा विश्‍वास होता. आमदारकी सोडणार्‍यांना जिंकण्याचा विश्‍वास असेल तर त्यांनी आधी निवडणूक लढवून जिंकून दाखवावे. त्यांनी आमदारकी मिळवून दाखवावी, असे आव्हानही ढवळीकर यांनी दिले.
भाजपचे नेते शिरोडा पोटनिवडणूक ‘मगो लढवणार नाही’ असे म्हणणार, मग त्यावर आपण  ‘लढवणार’ म्हणणार, असे किती दिवस चालणार आहे, असा प्रश्‍न करून पोटनिवडणुकीचे अर्ज मागे घेण्याच्या दिवशी नेमके किती आणि कोण उमेदवार रिंगणात आहेत, ते सर्वांनाच समजणार आहे. त्या दिवशी चित्र स्पष्ट दिसेल, असा टोमणाही दीपक  ढवळीकर यांनी मारला. आपण   निवडून आलो, तर मगो भाजपबरोबरच राहणार आहे, याचा पुनरूच्चार करून आम्ही भाजप आघाडी सरकारला पाठिंबा दिला असून तो कायम राहणार असून सरकार कधीही पाडले जाणार नाही, असे   दीपक ढवळीकर यांनी सांगितले. 

आम्हाला लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच सत्तेवर येणे गरजेचे आहे. मगोची बाजू आम्ही स्पष्टपणे मांडली असून अन्य राजकीय पक्षांची काय भूमिका आहे, हे आम्हाला माहीत नाही, असे ते म्हणाले. 

मांद्रे, म्हापशाबाबत आज निर्णय : दीपक ढवळीकर

मगोच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक बुधवारी (दि.27) दुपारी पणजी मुख्यालयात घेण्यात येणार आहे. या बैठकीत मांद्रे  आणि म्हापसा पोटनिवडणुकीत मगोचा उमेदवार उतरवायचा की नाही, यावर निर्णय घेण्यात येणार आहे, असे मगो पक्षाध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी सांगितले. लोकसभेसाठी भाजपला मगोचा पाठिंबा हवा असेल तर आमच्याशी बोलणी करण्यास हरकत नाही. अन्य कोणत्याही बाबीत भाजपने हस्तक्षेप न केलेला बरा. पोटनिवडणुकीत मगोला उमेदवार उभा करण्याचे स्वातंत्र्य असल्याचेही ढवळीकर म्हणाले.