Wed, May 27, 2020 17:41होमपेज › Goa › देणगी गोळा न केल्याने विद्यार्थी वर्गाबाहेर

देणगी गोळा न केल्याने विद्यार्थी वर्गाबाहेर

Published On: Dec 17 2017 1:41AM | Last Updated: Dec 17 2017 1:40AM

बुकमार्क करा

मडगाव : विशाल नाईक

नाताळ सण जवळ आल्याने या संधीचे सोने करण्यासाठी दक्षिण गोव्यातील काही खासगी शैक्षणिक  संस्थांनी विद्यार्थ्यांना देणगी गोळा करण्याच्या कामास जुंपले आहे. हा प्रकार चर्चेत असताना प्राथमिक शाळा आणि विद्यालय चालविणार्‍या चांदोरस्थित एका शैक्षणिक संस्थेने दिलेल्या वेळेत देणगी गोळा करू न शकल्याने सुमारे दीडशे विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर हाकलल्याचा प्रकार समोर आला आहे. शिक्षण संचालनालयाने या प्रकाराची गंभीर दखल घेतल्याची माहिती शिक्षण संचालक गजानन भट यांनी दिली.

गजानन भट म्हणाले, या गैरप्रकाराचे पुरावे विद्यार्थ्यांच्या पालकांनी पाठवावेत, संबंधित शाळा प्रशासनावर कारवाई केली जाईल. पालकांनी न घाबरता शिक्षण खात्याकडे या गैरप्रकारांंबाबत तक्रार करावी.

याबाबत मिळालेल्या माहितीप्रमाणे, शनिवारी हा प्रकार उघडकीस आला. सुमारे दीडशे विद्यार्थी चांदोर येथील रस्त्यावर थांबून, लोकांना अडवून त्यांच्याकडे देणगीसाठी गयावया करत होते. काही विद्यार्थी प्रत्येक दुकानात देणगी मागण्यासाठी फिरत होते. काहीजण चांदोर परिसरत घरोघरी जाऊन देणगी मागत आहेत. काही विद्यार्थ्यांनी आपल्या घरी जाऊन पालकांकडून पैसे आणले. तिसरी आणि चौथीत शिकणारे विद्यार्थीही कुडचडे, मडगावमार्गे ये-जा करणार्‍या दुचाकी थांबवून त्यांच्याकडून देणगीसाठी याचना करीत होते. चांदोर भागात दिवसभर हा चर्चेचा विषय होता.

‘आम्ही विद्यार्थ्यांना बाहेर पाठवलेच नाही’

चांदोर येथून कुडचडे येथे जाणार्‍या मार्गावरील बसथांबा आहे. विद्यालयासमोर एक दारूचे दुकान आहे. शिवाय रस्त्यावर एक गतिरोधकही आहे. अनेक विद्यार्थी शनिवारी या गतिरोधकाजवळ थांबून वाहने थांबवत होते. दुपारी थकलेले विद्यार्थी बसथांब्यावर थांबले होते. विद्यार्थ्यांच्या पालकांना हा प्रकार समजताच त्यांनी संबंधीत शाळेच्या प्राध्यापकांची भेट घेतली. मात्र, आम्ही विद्यार्थ्यांना बाहेर पाठवलेच नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. 

देणगी आणण्यासाठी शाळेने दिलेला फॉर्म पूर्णपणे न भरल्याने शाळा सुरू होताच आम्हाला वर्गात बसू न देता देणगी आणण्यासाठी वर्गाबाहेर पाठवल्याचे काही विद्यार्थ्यांनी सांगितले.

मिनाज बेग म्हणाल्या, देणगी गोळा करण्यासाठी दिलेल्या फॉर्ममध्ये असणार्‍या रकान्यांमध्ये देणगीदारांची नावे लिहून द्यायची होती, मात्र तो अपूर्ण होता. तो भरला असता तर आणखी देणगी शाळेला मिळणार होती.  मात्र, या शाळेत शिकणार्‍या आपल्या बहिणीला शाळेतून घरी पाठवण्यात आले. तिला शाळेतून का बाहेर काढले, हे विचारण्यासाठी आपण तिच्यासोबत शाळेत गेलो असता मुख्याध्यापकांनी आपण विद्यार्थ्यांना बाहेर पाठवलेच नाही, असा पवित्रा  घेतला. कोणत्याही सुरक्षेशिवाय विद्यार्थ्यांंना रस्त्यावर पाठविल्याबद्दल मिनाज यांनी नाराजी व्यक्त केली.

चांदोर येथील नितल नाईक म्हणाले, दुपारी अचानक अनेक विद्यार्थी रस्त्यावर फिरून देणगी मागताना आढळले. विद्यार्थ्यांच्या पालकांनी या प्रकाराची दखल घेऊन शाळेत जाऊन यासंबंधी मुख्याध्यापकांना जाब विचारला.