Thu, Jul 02, 2020 15:26होमपेज › Goa › ‘गोवा माईल्स’वर मुख्यमंत्र्यांची टॅक्सी चालकांशी चर्चा अनिर्णित

‘गोवा माईल्स’वर मुख्यमंत्र्यांची टॅक्सी चालकांशी चर्चा अनिर्णित

Published On: Jul 24 2019 1:39AM | Last Updated: Jul 24 2019 1:39AM
पणजी : प्रतिनिधी

राज्यातील पर्यटक टॅक्सी चालकांच्या प्रतिनिधीकडे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि ग्रामीण विकास मंत्री मायकल लोबो यांनी घेतलेल्या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. पर्यटक टॅक्सी चालक ‘गोवा माईल्स’ अ‍ॅप पूर्णपणे बंद करण्याच्या मागणीवर ठाम राहिल्याने या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नसल्याने येत्या शुक्रवारी पुन्हा बैठक घेतली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.     

मुख्यमंत्री सावंत आणि मंत्री लोबो यांची विधानसभा संकुलात मंगळवारी पर्यटक टॅक्सी चालकांच्या एका शिष्टमंडळाने भेट घेतली. या बैठकीत गोवा पर्यटन विकास महामंडळाने (जीटीडीसी) सुरू केलेल्या ‘गोवा माईल्स’ टॅक्सीसेवेला खासगी टॅक्सी चालकांनी विरोध केला. या अ‍ॅपला विरोध कायम राहणार असल्याचे खासगी टॅक्सी मालकांच्या शिष्टमंडळाने स्पष्ट केले. या वादावर अन्य काही तोडगा सूचवण्याबाबत या शिष्टमंडळाला सांगण्यात आले असून या वादाविषयी ‘गोवा माईल्स’च्या चालकांकडे चर्चा केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

मंत्री लोबो म्हणाले की, टॅक्सी चालकांच्या दोन्ही गटांना समोरासमोर बसवून या वादावर तोडगा काढला जाणार आहे. खासगी टॅक्सीचालकांकडून भरमसाठ दर लागू होत असल्याच्या पर्यटकांच्या तक्रारी असून दराबाबत पारदर्शकता असणे गरजेचे आहे. 

‘गोवा माईल्स’ बंद करणार नाही : मुख्यमंत्री

 राज्यात दाखल होणार्‍या पर्यटकांना चांगली टॅक्सी सेवा आणि दर मिळावा, याविषयी सरकार पारदर्शकता बाळगणार आहे. ‘गोवा माईल्स’ सेवा बंद करण्याचा प्रश्नच नाही. खासगी टॅक्सीचालकांचे प्रश्न आपण समजून घेतले असून ‘गोवा माईल्स’च्या चालकांशी वाद-भांडण न करण्याचा सल्ला आपण दिला असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.