Mon, May 25, 2020 02:50होमपेज › Goa › यशाच्या पुनरावृत्तीचे भाजपपुढे आव्हान

यशाच्या पुनरावृत्तीचे भाजपपुढे आव्हान

Published On: Feb 17 2019 2:04AM | Last Updated: Feb 17 2019 2:04AM
सुरेश स. नाईक
 

गोव्यात लोकसभेच्या निवडणुकांबरोबर विधानसभेच्या दोन मतदार संघातील पोटनिवडणुकाही घेतल्या जाण्याची चर्चा आहे. या पोटनिवडणुकांच्या निकालावर सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या बलाबलाची नवी समीकरणे अवलंबून असल्याने सध्या लोकसभा निवडणुकीपेक्षा या पोटनिवडणुकासंबंधीची चर्चा व हालचाली जोरात आहेत. गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा गेल्याखेपेस भारतीय जनता पक्षाने जिंकल्या. याच विद्यमान खासदारांना आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा उमेदवारी मिळेल. यापैकी केंद्रीय आयुष राजमंत्री (स्वतंत्र भार) श्रीपाद नाईक हे  1999पासून गेल्या  सलग चार निवडणुका उत्तर गोवा मतदार संघातून जिंकून आलेले आहेत. 

दक्षिण गोवा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. आतापर्यंत एक पोटनिवडणूक धरून झालेल्या सोळा निवडणुकांपैकी नऊ वेळा काँग्रेसने या मतदार संघात विजय मिळविला आहे. परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री राहिलेले एदुआर्दु फालेरो यांनी 1977 ते 1991 पर्यंत झालेल्या निवडणुकांत  सलग पाचवेळा निवडून येण्याचा विक्रम केला आहे. काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या या मतदार संघात 2014 च्या मोदी लाटेत भाजपचे अ‍ॅड. नरेंद्र सावईकर निवडून आले. त्या आधी 1999 मध्ये एकदाच भाजपला या मतदार संघात रमाकांत आंगले यांच्या रूपाने विजय मिळविता आला होता. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मिशन सालसेत राबवून विधानसभेचे सात मतदारसंघ असलेल्या ख्रिस्तीबहुल सासष्टी तालुक्यात भाजपचा पाया घालण्याचा प्रयत्न केला होता. भाजपची स्वीकारार्हता ख्रिस्ती समाजात रुजविण्याचा व वाढविण्यात त्यांनी यश मिळविले आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी गेल्या शनिवारी भाजप कार्यकर्त्यांच्या घेतलेल्या सभेत निवडणुुकासंबंधी मार्गदर्शन केल्यानंतर मंत्री आमदारांना व नेत्यांना तीस टक्के मते (ख्रिश्‍चनांची) लक्ष्य करण्याचा कानमंत्र दिला आहे. 

भाजपकडे आजच्या 14 पैकी सात आमदार ख्रिस्ती आहेत. राज्यातील सरकारच्या आघाडीत भाजपसह गोवा फॉरवर्ड (3) महाराष्ट्र्रवादी गोमंतक पक्ष (3) व अपक्ष तीन असे एकूण 23 आमदारांचे संख्यात्मक बळ भाजपकडे आहे. दोन ठिकाणचे काँग्रेसचे आमदार भाजपमध्ये सामील झालेले आहेत. विरोधात काँग्रेसकडे 14 विधानसभा मतदारसंघ आहेत. चर्चिल आलेमाव हे एकमेव राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीत गोवा फॉरवर्डने स्वारस्य दाखविलेले नाही. मगोपला विधानसेच्या पोटनिवडणुकात अधिक स्वारस्य आहे. भाजपशी या जुन्या सहकार्‍याचे अलीकडच्या काळात संबंध खट्टेमिठे झालेले आहेत. मध्यंतरी लोकसभा निवडणुकीत उतरण्याचे इशारेे मगोपने भाजपला दिले होते. मगोपने पोटनिवडणूक लढवू नये, अशी भाजपची भावना आहे. तर किमान शिरोडा मतदार संघात पोटनिवडणूक लढविण्यावर मगोप ठाम आहे. दोन्ही निवडणुका एकदम घ्यायच्या ठरल्या, तर मगोप नेमकी कोणती भूमिका घेईल, असाही प्रश्‍न चर्चेत आहे.   

दक्षिण गोव्यात भाजपचे माजी आमदार रमेश तवडकर हे स्वतंत्रपणे निवडणूक लढवतील, अशी चर्चा आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी डावलली गेल्याने त्यांनी भाजपशी फारकत घेतली. स्वतंत्रपणे निवडणूक लढविली. ते जिंकले नाहीत; पण भाजपचा अधिकृत उमेदवारही विजयी होऊ शकला नाही. मध्यंतरी पक्षाचे संघटन सचिव म्हणून पुन्हा जबाबदारी दिलेले सतीश धोंड यांनी तवडकरांची भेट घेऊन स्वगृही परतण्यासाठी त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न केले. मात्र, त्यांची भेट वैयक्‍तिक असल्याचा अभिप्राय प्रदेशाध्यक्ष खासदार तेंडुलकर यांनी व्यक्‍त केल्याने तवडकरांबाबत भाजपच्या मनात नेमके काय आहे, याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. ते रिंगणात उतरले तर काणकोण विधानसभा विभागात भाजपला अडचण येईल. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे सोपटे यांना स्वीकारायला तयार नाहीत. पोटनिवडणुकीत सोपटेंना उमेदवारी देण्याला त्यांचा विरोध आहे. तो मान्य होणार नसल्याने लोकसभा निवडणुकीत पार्सेकर यांचा भाजप उमेदवाराला कितपत पाठिंबा मिळेल, याची शंका आहे. खाणबंदीवर वर्षभर तोडगा न निघाल्याचा मुद्दा दोन्ही मतदार संघात विशेषतः दक्षिण गोव्यात भाजपला त्रासदायक ठरणार आहे. खाण अवलंबितांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अलीकडे भेट घेतल्यानंतर खाणी सुरू करण्याच्या दृष्टीने उपाय योजण्यासंबंधी हालचाली सुरू झाल्या आहेत; पण तोडगा काढण्याच्या घोळात वाया गेलेले वर्ष आणि त्यामुळे खाण अवलंबितांची झालेली परवड, प्रत्यक्षात दृष्टिपथात नसलेला तोडगा या सावल्या भाजपला सतावत राहणारच आहे. काँग्रेस पक्षाचे उमेदवार कोण असतील, याविषयी अजून स्पष्ट संकेत मिळत नाहीत. काँग्रेस संघटना बर्‍यापैकी जानदार बनविण्यात प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांना यश मिळाले आहे. त्यांच्या नावाबरोबर  महिला प्रदेशाध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांच्या नावाची दक्षिण गोवा मतदार संघासाठी आणि माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप, जितेंद्र देशप्रभूू यांच्या नावांची उत्तर गोवा मतदार संघासाठी थोडीफार चर्चा कानी पडते. ते निवडणुकीची घोषणा झाल्यानंतरच उमेदवारांबाबतची स्पष्टता दिसणार आहे.