Wed, Jul 08, 2020 12:54होमपेज › Goa › सिनेतंत्राचे‘इफ्फी अ‍ॅट 50’त डिजीटल प्रदर्शन

सिनेतंत्राचे‘इफ्फी अ‍ॅट 50’त डिजीटल प्रदर्शन

Last Updated: Nov 21 2019 9:50PM
पणजी : प्रतिनिधी

सुवर्ण महोत्सवी इफ्फीनिमित आयोजित प्रदर्शनात चित्रपटसृष्टीकडून वापरण्यात येणार्‍या वेगवेगळ्या नव्या तंत्रज्ञानाबाबतची माहिती  देण्यात आल्याने ‘इफ्फी अ‍ॅट 50’कडे युवा वर्ग मोठया प्रमाणात आकर्षित होईल, असा विश्‍वास  माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव अमित खरे यांनी  कला अकादमीलगतच्या दर्या संगमावर आयोजित ‘इफ्फी अ‍ॅट 50’ या डिजीटल प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी व्यक्‍त केला.

चित्रपटक्षेत्राकडे युवा वर्गाने वळावे या हेतून या डिजीटल प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. मागील वर्षी या चित्रपटक्षेत्राने 13.5 टक्के वाढ नोंद केली होती.  फिल्म बाजाराप्रमाणेच या प्रदर्शनाकडे  देखील युवक तसेच चित्रपट महोत्सवात सहभागी होणारे प्रतिनिधी आकर्षित होतील, असेही त्यांनी सांगितले.

या प्रदर्शनात चित्रपटांचा इतिहास  डिजीटल पध्दतीने मांडण्यात आला असून 1950-60 च्या दशकातील चित्रपटांबरोबर 2010 पर्यंतच्या चित्रपटांची माहिती यात देण्यात आली आहे. हे डिजीटल प्रदर्शन 28 नोव्हेंबरपर्यंत  चालणार असून ते सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत खुले असेल.

सुवर्ण महोत्सवी ‘इफ्फी’निमित्त या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. 1952 साली पहिल्या ‘इफ्फी’चे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा पासून ते आतापर्यंतचा प्रवास यात दर्शवण्यात आला आहे. जगाला भारतीय सिनेमाची माहिती समजावी तसेच जागतिक सिनेमासाठी भारतीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या हेतून या डिजीटल प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या पार्श्‍वभूमीवर  चित्रपट प्रश्‍नोत्तर स्पर्धा, स्वच्छ भारत, प्लास्टीक बंदी, एक भारत श्रेष्ठ भारत या विषयांवर शॉर्ट फिल्म मेकींग, चित्रकला आदीचे  आयोजन करण्यात आले आहे.