Fri, Feb 22, 2019 14:15होमपेज › Goa › ‘लुबान’मुळे गुरुवारीही पाणी किनार्‍यावर

‘लुबान’मुळे गुरुवारीही पाणी किनार्‍यावर

Published On: Oct 12 2018 1:04AM | Last Updated: Oct 12 2018 1:04AMपणजी : प्रतिनिधी

‘लुबान’ वादळाचे तडाखे अजूनही गोव्याच्या किनारपट्टीला बसत असून गुरुवारी (दि.11) दुपारी पुन्हा एकदा समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्याने दक्षिण आणि उत्तर गोव्यातील किनार्‍यांवर पाणी चढल्याचे दिसून आले. किनारपट्टीवरील अनेक ठिकाणी बुधवारपेक्षा गुरुवारी अधिक पाणी चढल्याने अनेक शॅक्समध्ये पाणी घुसले. किनार्‍यावरील अनेक झाडे कोसळली असून आणखी  कित्येक झाडे कोसळण्याच्या स्थितीत आहेत.

दक्षिण गोव्यात कोलवा, बाणावली, माजोर्डा, उतोर्डा, काणकोण तर उत्तर गोव्यात कांदोळी, कळंगुट, सिकेरी, वागातोर, अंजुणा, मोरजी आणि हरमल या किनार्‍यांवर पाणी वाढल्याचे सांगण्यात आले.  
किनारपट्टीवर पाण्याची पातळी वाढल्याने  पर्यटकांनी  समुद्रात उतरू नये यासाठी किनार्‍यावर लाल झेंडे ठिकठिकाणी लावले आहेत.  

मागच्या वर्षी डिसेंबर 17 मध्ये आलेल्या ‘ओखी’ वादळाने गोव्यातील शॅक मालकांचे कंबरडे मोडले होते. त्या वादळात शॅकवाल्यांना मोठे नुकसान सोसावे लागले होते. हे नुकसान यावेळी भरुन काढण्याच्या इराद्याने गोव्यातील सर्व समुद्र किनार्‍यावर शॅक उभारणीच्या कामाला सुरुवात झाली होती. मात्र, हे काम चालू असतानाच लुबानचा फटका बसल्याने हे व्यावसायिक पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत.

कळंगूट येथील एका शॅक व्यावसायिकाने सांगितले की, बुधवारी रात्री पाण्याची पातळी उतरु लागली होती. त्यामुळे आम्हाला काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. मात्र, गुरुवारी दुपारी पुन्हा एकदा पाणी वाढले. ही वाढ बुधवारपेक्षा अधिक होती. येत्या दोन दिवसांत परिस्थिती पूर्वपदावर येईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.