Fri, May 29, 2020 21:22होमपेज › Goa › कोरोना : कळंगुट परिसरात शुकशुकाट 

कोरोना : कळंगुट परिसरात शुकशुकाट 

Last Updated: Mar 21 2020 1:14AM
बार्देश  : पुढारी वृत्तसेवा

जागतिक महामारी म्हणून हाहाकार माजवणार्‍या कोरोनाची दहशत आता कळंगुटपर्यंत पोहोचलेली असून शुक्रवारी दिवसभर कळंगुटातील मुख्य रस्ते ,बाजारपेठ तसेच किनारी भागात शुकशुकाट पसरला होता. दरम्यान, या अघोषित बंदमुळे पर्यटकांची संपूर्ण दिवसभर मोठ्या प्रमाणात गैरसोय झाल्याचे चित्र दिसत होते.   

शांतादुर्गा मंदिर परिसर, मासळी मार्केट परिसर आणि बागापासून ते कळंगुटच्या किनारी भागातील बहुतेक चहा- रेस्टॉरंट्स स्थानिक व्यावसायिकांनी कोरोनाचा धसका घेऊन बंद ठेवल्याने याभागात उतरलेल्या देशी पर्यटकांना चहा, नाष्टा तसेच जेवण मिळणे कठीण बनल्याने  त्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. दरम्यान, कळंगुटच्या मुख्य रस्त्याशेजारची ठराविक उडपी हॉटेलवाल्यांनी पर्यटकांसाठी चहा-नाश्त्याची सोय उपलब्ध करून दिल्यामुळे अनेकांनी त्याचा फायदा घेतला. दरम्यान, या घटनेने गांगरलेल्या बहुतेक पर्यटकांनी दुपारनंतर आपापल्या हॉटेल तसेच गेस्ट हाऊसमध्ये राहणे पसंत केले.

दरम्यान, याच संधीचा फायदा उठवून अनेकांनी  दाम-दुप्पट दराने पर्यटकांना जेवणावळीची सोय करून दिली. स्थानिक मासळी मार्केटमध्ये सकाळची वेळ सोडल्यास त्यानंतर शुकशुकाट पसरलेला होता.  मासळी विक्रेत्या महिलांनी सकाळी  11 वाजल्या नंतर बाजारात उपलब्ध असलेली  मासळी विक्रीस न ठेवता  बंद पेट्यात  साठवून मार्केटला टाळे ठोकल्यामुळे स्थानिकांचीही मासळीसाठी मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली.  शांतादुर्गा मंदिर परिसरात भाविकांचीही ये-जा अल्प प्रमाणात होती . परिस्थितीचा अंदाज घेत येणार्‍या काळात परिसरातील मंदिर तसेच चर्चेस भाविकांसाठी खुली ठेवायची की नाहीत यांवर लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येणार असल्याचे एका देवस्थानच्या प्रमुखाने नाव   प्रसिध्द न करण्याच्या अटीवर सांगितले.  

दरम्यान, शिवोली येथील श्री. जागरेश्वर देवस्थानचा साप्ताहिक महाप्रसादाचा कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या काळासाठी बंद ठेवण्यात येत असल्याचे देवस्थानने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. याभागातील प्रसिद्ध स्वामी समर्थ मठात दर गुरुवारी आयोजित  होणारा  महाप्रसादाचा कार्यक्रम मागील गुरुवारपासून स्थगित ठेवण्यात आला आहे. कोरोनाच्या भितीचे सावट आता जगप्रसिद्ध कळंगुटात, दिवसभर बाजारपेठ , रेस्टॉरंट्स बंद ठेवल्याने पर्यटकांचे हाल.