Thu, May 28, 2020 05:54होमपेज › Goa › कोरोना ः जीवनावश्यक साहित्यासाठी गर्दी 

कोरोना ः जीवनावश्यक साहित्यासाठी गर्दी 

Last Updated: Mar 22 2020 12:25AM
पणजी : पुढारी वृत्तसेवा 

जगभरात फोफावत असलेल्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या मनात भीतीचे सावट पसरले आहे. आवश्यकता नसताना घराबाहेर पडू नये, अशी सूचना सरकारकडून  लोकांना देण्यात आल्याने मुलभूत खाण्यापिण्याचे सामान भरण्यासाठी लोकांची तयारी सुरू आहे. ग्राहकांकडून कडधान्य, तेल अशा वस्तूंना मागणी वाढल्याने पणजीतील सहकार भांडारचा व्यवसाय वाढला आहे. सहकार भांडारची उलाढाल गेल्या काही दिवसांनी 75 टक्क्यांनी वाढली आहे,अशी माहिती मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक काशिनाथ नाईक यांनी दिली.     

राज्यातील दुकाने तसेच राज्याची सीमा बंद होऊ शकते, या भीतीने काही दिवसांपासून गोवा सहकार भांडार तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांत लोकांची गर्दी दिसून येत आहे.   सहकार भंडारमध्ये एरवी दर आठवड्याला सामान भरले जाते. मात्र, मागणी वाढल्याने सामान लवकर संपत असल्याने दर एका दिवसाआड सामान भरावे लागत आहे. 

सहकार भांडारमध्ये सध्या ग्राहकांची संख्या दिवसाला दुप्पट झाली आहे. एरवी पाचशे ते सहाशे लोक  लोक सामान खरेदीसाठी यायचे. मात्र, गेल्या काही दिवसात ही संख्या हजारावर पोहचली आहे. दुप्पट संख्येमुळे व्यवहारही दुप्पट झाला आहे. शनिवारी सहकार भांडारमध्ये लोकांनी गर्दी केली होती. तेल, कडधान्य, दुधाचे टेट्रा पॅक यासारख्या जीवनावश्यक वस्तूंची खरेदी वाढली आहे, असेही नाईक यांनी सांगितले. 

कोरोनाव्हायरसमुळे सामान्य लोकांमध्ये भीती पसरली आहे.  सहकार भांडारमध्ये    माल पुरवठा करणार्‍यांनी  वस्तूंचे दर एक ते दोन रुपयांनी वाढविले आहेत.परिणामी जीवनावश्यक वस्तूंचे दर 0.5 टक्क्यांनी वाढले आहेत. जीवनावश्यक वस्तूंचे दर जरी वाढले असले तरी ग्राहकांना मात्र पूर्वीच्या दरातच सामान पुरवले जात आहे, असेही नाईक यांनी सांगितले.  

कोरोनाच्या भीतीमुळे काही आवश्यक वस्तूंची खरेदी वाढली आहे. सहकार भांडारचा राज्यातील सर्व केंद्रांचा प्रतिदिन  उलाढाल चार लाखांवरून सुमारे आठ लाखांपर्यंत पोहचली आहे.  काहीजण अधिकाधिक सामान  विकत घेऊ पहात असून, साहित्य सर्व ग्राहकांना मिळावे या उद्देशाने  काही साहित्याच्या बिलिंगवर सहकार भांडारकडून मर्यादा घालण्यात आली आहे.
- काशिनाथ नाईक, 
मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक