Thu, May 28, 2020 19:32होमपेज › Goa › आचारसंहिता भंग तक्रारीसंदर्भात न्यायालयात जाण्याचा काँग्रेसचा इशारा 

आचारसंहिता भंग तक्रारीसंदर्भात न्यायालयात जाण्याचा काँग्रेसचा इशारा 

Published On: Apr 10 2019 1:54AM | Last Updated: Apr 10 2019 1:30AM
पणजी : प्रतिनिधी 

राज्यात आचारसंहिता लागू  असताना  दोन उपमुख्यमंत्र्यांची नियुक्‍ती करणे  म्हणजे आचारसंहितेचे उल्‍लंघन केल्यासारखे आहे. या विरोधात काँग्रेस पक्षाकडून  निवडणूक आयोगाकडे दि. 20 मार्च रोजी  तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीला 20 दिवस उलटले तरी  काहीच निर्णय झालेला नाही. निवडणूक आयोगाने या विरोधात कारवाई केल्यास  काँग्रेस न्यायालयात जाणार, असा इशारा प्रदेश काँग्रेसचे प्रवक्‍ते  रोहित ब्राझ डिसा यांनी पत्रकार परिषदेत दिला. 

डिसा म्हणाले, की राज्यात लोकसभा तसेच पोटनिवडणुकीची आचारसंहिता लागू आहे.  हा निवडणूका पारदर्शक  होणे हा आचारसंहितेचा उद्देश आहे. मात्र सरकारने आचारसंहितेचे पालन केलेले नाही. आचारसंहित काळात कुठलेच प्रशासकीय निर्णय घेतले जाऊ शकत नाहीत.   भाजप सरकारच्या सर्वसाधारण प्रशासन खात्याने दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्‍तीचा आदेश जारी केला. आचारसंहिता लागू असताना प्रशासकीय आदेश जारी करणे  बेकायदेशीर नव्हे तर आचारसंहितेचे उल्‍लंघन ठरते.  त्यामुळे  सरकारने दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्‍तीचा निर्णय हा मतदारांना भुलवण्याचा प्रयत्न आहे. 

मुख्य  निवडणूक अधिकार्‍यांनी याची ताबडतोब दखल घेऊन  हा आदेश त्वरित रद्द करण्याची गरज होती. आयोगाला काँग्रेसकडून वेळोवेळी  तक्रारीबद्दल आठवणी करून दिली आहे. निवडणूक आयोगाने आता तरी याची  दखल घ्यायला हवी, अन्यथा काँग्र्रेस  न्यायालयात याचिका दाखल करणार,  असेही डिसा यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत ट्रोजन डिमेलो व तुलिओ डिसोझा उपस्थित होते. 

आचारसंहिता भंगची तक्रार करणार : डिसा

आचारसंहिता भंग केल्या प्रकरणी  भाजप विरोधात लवकरच आणखी एक तक्रार नोंदवली जाणार आहे. राज्यातील कदंब  बसेसवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र लावण्यात आले आहे. आचारसंहिता सुरू असताना मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजप कडून अशी जाहिरात केली जात आहे. मात्र, काँग्रेस या विरोधात लवकरच तक्रार दाखल करणार, अशी माहिती   रोहीत  डिसा यांनी दिली.