Mon, Sep 16, 2019 05:31होमपेज › Goa › काँग्रेस कार्यकर्त्यांवरील हल्‍ला सरकार पुरस्कृत : चोडणकर

काँग्रेस कार्यकर्त्यांवरील हल्‍ला सरकार पुरस्कृत : चोडणकर

Published On: Dec 23 2018 1:08AM | Last Updated: Dec 23 2018 1:08AM
पणजी :  प्रतिनिधी

भाजप कार्यकर्त्यांनी मोर्चावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांवर केलेला हल्‍ला हा सरकार पुरस्कृत होता. मुख्यमंत्री, सभापती कार्यालय तसेच पोलिसांचा त्यांना पाठिंबा होता, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला. या मोर्चावेळी करण्यात आलेल्या धक्‍काबुक्‍कीप्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्यांवर दाखल केलेल्या खोट्या तक्रारी त्वरित मागे घ्याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.

भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांवर केलेल्या हल्ल्याचा निषेध करून चोडणकर म्हणाले की, सत्ताधारी पक्षाकडून  विरोधी पक्षाच्या कार्यालयावर अशा प्रकारे पहिल्यांदाच मोर्चा नेण्यात आला होता. राजकीय भांडणासाठी राजकीय व्यासपीठाचाच वापर करावा. राफेल करारप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात काढण्यात आलेला मोर्चा शांतपणे आयोजित करणे आवश्यक होते. परंतु भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांवर चप्पल, पाण्याच्या बाटल्या फेकून त्यांच्यावर हल्‍ला केला, असा आरोप त्यांनी केला.

प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो यांच्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी हल्‍ला केला. मात्र, पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. काँग्रेसने हिंसा केली नाही. भाजपला या सर्वासाठी जनताच धडा शिकवणार, असा इशाराही त्यांनी दिला.

भाजपने केवळ फेरीबोट धक्क्यापर्यंतच मोर्चा काढण्यासाठी परवानगी घेतली होती. मात्र, ते काँग्रेस कार्यालयापर्यंत आले. सदर मोर्चाला परवानगी नसतानादेखील पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. सदर हल्‍ला हा सरकार पुरस्कृत होता. या मोर्चात मुख्यमंत्री, सभापती कार्यालयात काम करणार्‍यांचा समावेश होता, ज्यांना सरकारतर्फे पगार मिळतो. यावरुन या मोर्चाला  मुख्यमंत्री, सभापती कार्यालय तसेच पोलिसांचा पाठिंबा होता हे सिध्द होते, असेही चोडणकर म्हणाले.

विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या कृतीचा निषेध करून सांगितले की, मोर्चाला परवानगी नव्हती. मोर्चामुळे सुमारे दीड तास वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने जनतेला त्याचा फटका बसला. काँग्रेस पक्ष सत्तेत असताना त्यांनी कधीच विरोधी पक्षाच्या कार्यालयावर मोर्चा नेला नसल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपकडून सत्तेचा गैरवापर केला जात आहे.  पक्षश्रेष्ठींच्या चुकीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. खाण समस्या, बेरोजगारी आदी जनतेला भेडसावणार्‍या प्रश्‍नांसाठी भाजप मोर्चा का काढत नाही. मोर्चावेळी जे घडले त्याला जबाबदार असलेले भाजप नेते तसेच पोलिसांवर त्वरित कारवाई व्हावी, अशी मागणीही कवळेकर यांनी केली. आमदार प्रतापसिंह राणे, दिगंबर कामत, जेनिफर मोन्सेरात, फ्रान्सिस सिल्वेरा, विल्फ्रेड डिसा, फिलीप नेरी रॉड्रिग्स, निळकंठ हळर्णकर यावेळी  उपस्थित होते.

‘पूर्वाश्रमीच्या काँग्रेस नेत्यांना पक्षप्रवेश नाही’ भाजपने काढलेल्या मोर्चात जे मंत्री सहभागी झाले होते ते पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते होते. या नेत्यांना पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, असे विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी भाजपच्या मोर्चात सहभागी झालेले आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे व पंचायत मंत्री माविन गुदिन्हो  यांच्याविषयी  विचारण्यात आलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले.