Sat, Aug 24, 2019 09:45होमपेज › Goa › सरकार स्थापनेसाठी काँग्रेसचे निवेदन

सरकार स्थापनेसाठी काँग्रेसचे निवेदन

Published On: Sep 18 2018 1:35AM | Last Updated: Sep 18 2018 12:50AMपणजी : प्रतिनिधी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आजारपणाच्या पार्श्‍वभूमीवर गोव्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून, विरोधी काँग्रेसने राज्यपालांना सोमवारी सरकार स्थापन करू देण्यासाठी निवेदन सादर केले. राज्यपालांनी विधानसभा विसर्जित न करता राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसला सत्ता स्थापनेची संधी द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे, असे विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी सांगितले. राज्यपालांच्या अनुपस्थितीत त्यांच्या सचिवांकडे निवेदन सोपवण्यात आले.

सरकार आघाडीच्या घटक पक्षातील नेत्यांशी चर्चा करण्यासाठी दिल्लीहून भाजपचे त्रिसदस्यीय निरीक्षक शिष्टमंडळ आल्याची काँग्रेसने गंभीर दखल घेऊन पर्वरीतील विधानसभा संकुलातील विरोधी पक्षनेत्यांच्या कक्षात विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळी काँग्रेस विधिमंडळ गटाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत कधी नव्हे ते काँग्रेसच्या 16 ही आमदारांनी उपस्थिती लावल्याने अनेकांनी आश्‍चर्य व्यक्‍त केले. सर्व आमदारांनी लगेच सत्ता स्थापनेचा दावा करण्याचे ठरवले. काँग्रेस सत्तेवर आल्यास आणखीन किमान सहा आमदार पाठिंबा देतील, अशा आशयाची चर्चा बैठकीत झाल्याचे एका आमदाराने सांगितले. 

या बैठकीनंतर काँगे्रसच्या सर्व 16 ही आमदारांनी दोनापावला येथे राजभवनाकडे धाव घेतली. राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा या पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी दिल्लीत असल्याने राज्यपालांशी या आमदारांची भेट होऊ शकली नाही. राज्यपालांच्या अनुपस्थितीत त्यांच्या सचिवांकडे काँगेे्रसने दोन निवेदने सादर केली. 

राजभवनाबाहेर पत्रकारांशी बोलताना विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर म्हणाले की, मुख्यमंत्री गंभीर आजारी असल्याने नेतृत्त्वाबाबत पर्याय शोधण्यावरून भाजप आघाडी सरकारच्या घटक पक्षांत वाद निर्माण झाला आहे. यावर भाजपकडून कदाचित विधानसभा विसर्जित करण्याची मागणी होण्याची शक्यता आहे. राज्यपालांनी सदर मागणी मान्य  करू नये, अशी विनंती काँग्रेसने दोन लेखी निवेदनांद्वारे केली. 

2017 च्या निवडणुकीत काँग्रेस हा 40 पैकी 17 जागांवर विजय मिळवून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.  भाजपला 13 जागांवर विजय मिळाला होता, तर गोवा फॉरवर्ड व मगोप प्रत्येकी 3 तर राष्ट्रवादी काँग्रेस एक तर अपक्ष उमेदवारांनी 3 जागांवर विजय मिळवला आहे. यामुळे सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस (सध्या 16 आमदार) सरकार स्थापनेची जबाबदारी स्वीकारण्यास तयार आहे. सध्या गोव्यात सरकार असूनही नसल्यासारखेच आहे. अन्य काही पक्षाचे आमदार आणि अपक्ष  आमदारांच्या मदतीने विधानसभेत आम्ही बहुमत सिद्ध करू शकतो, असेही कवळेकर यांनी सांगितले.

राज्यपाल मृदुला सिन्हा यांची सोमवारी भेट न झाल्याने काँग्रेसने त्यांच्या भेटीसाठी पुन्हा वेळ मागितली आहे. त्यांना भेटण्यासाठी मंगळवारी  पुन्हा राजभवनात येणार असल्याचेही कवळेकर यांनी सांगितले.