Tue, May 26, 2020 09:52होमपेज › Goa › राहुल गांधी यांनी मनोहर पर्रीकरांची घेतली भेट

राहुल गांधी यांनी मनोहर पर्रीकरांची घेतली भेट

Published On: Jan 29 2019 1:49PM | Last Updated: Jan 29 2019 2:09PM
पणजी : पुढारी ऑनलाईन

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेतली. राहुल यांनी पर्रीकरांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात राफेल प्रकरणासंदर्भात भेट घेतली असल्याची चर्चा रंगली. पण काँग्रेसचे विरोधी पक्षनेते चंद्रकांत कोवळेकर यांनी या चर्चेला पुर्णविराम देत ही भेट खासगी असल्याचे सांगितले आहे. राहुल यांनी पर्रीकरांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केल्याचेही त्यांनी नमूद केले. 

संसदेच्या नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनानंतर सुट्टी घालवण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी आणि माजी अध्यक्ष  सोनिया गांधी दक्षिण गोव्यात दाखल झाले आहेत. राहुल गांधी यांनी मुख्यंमत्री कार्यालयात जाऊन मनोहर पर्रीकर यांची भेट घेतली. 

काही दिवसांपूर्वी काँग्रेसने एक ऑडीओ क्‍लीप प्रसारीत केली होती. ज्‍यामध्ये मनोहर पर्रीकर यांनी मंत्री विश्वजीत राणे यांना राफेल संबंधीची कागदपत्रे आपल्‍या बेडरूम मध्ये असल्‍याचे म्‍हटले होते. त्यामुळे राहुल गांधी यांनी आज राफेल प्रकरणासंदर्भातच मनोहर पर्रीकर यांची भेट घेतली असल्याचा तर्क राजकीय वर्तुळात लावला जात आहे.