Fri, May 29, 2020 22:45होमपेज › Goa › म्हापसा, शिरोड्यातील काँग्रेसचे उमेदवार जाहीर

म्हापसा, शिरोड्यातील काँग्रेसचे उमेदवार जाहीर

Published On: Mar 30 2019 1:36AM | Last Updated: Mar 30 2019 1:36AM
पणजी : प्रतिनिधी

काँग्रेसने विधानसभेच्या  म्हापसा व शिरोडा मतदारसंघात होणार्‍या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. अनुक्रमे सुधीर कांदोळकर व  महादेव नाईक यांची उमेदवारी जाहीर केली आहे. मांद्रे पोटनिवडणूक उमेदवारीचा तिढा कायम असून उमेदवाराच्या नावाची घोषणा शनिवारी (दि.30) केली जाणार असल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली. 

दरम्यान, मांद्रे मतदारसंघात होणार्‍या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारीवरून शुक्रवारी वातावरण बरेच तापल्याने कार्यकर्त्यांमध्ये जुंपली. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते खेमलो सावंत यांना मारहाण करण्यात आली. काँग्रेस कार्यालयासमोरील रस्त्यावर सदर प्रकार घडला. तेथून जाणार्‍या वाहनचालकांनी बघ्याची  भूमिका घेतली.

मांद्रे विधानसभा पोटनिवडणुकीसाठी माजी केंद्रीय मंत्री अ‍ॅड. रमाकांत खलप यांना उमेदवारी  मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, खलप यांना उमेदवारी देण्यास  काँग्रेस कार्यकर्त्यांच्या एका गटाचा आक्षेप असून तो गट सचिन परब किंवा बाबी बागकर यांना उमेदवारी दिली जावी, अशी मागणी करीत आहेत, याच प्रसंगातून हा वाद उफाळून आल्याचे सांगण्यात येते. 

भाजपकडून म्हापशाचे दिवगंत आमदार फ्रान्सिस डिसोझा यांचे पुत्र जोशुआ डिसोझा यांना म्हापसा  पोटनिवडणुकीची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे प्रचंड नाराज बनलेले म्हापसा  पालिकेचे नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष सुधीर कांदोळकर यांनी कार्यकर्त्यांसमवेत भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.  काँग्रेसने त्यांना म्हापशाची उमेदवारी दिली आहे. प्रत्यक्षात काँग्रेसचे उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष  विजय भिके  हेदेखील उमेदवारीच्या शर्यतीत होते. शिरोड्यात काँग्रेसमध्ये दाखल झालेले मागील  भाजप सरकारमधील  मंत्री महादेव नाईक यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे.