Tue, May 26, 2020 08:35होमपेज › Goa › काँग्रेसींकडून सावंत सरकार सावरण्याचा प्रयत्न

काँग्रेसींकडून सावंत सरकार सावरण्याचा प्रयत्न

Last Updated: Dec 02 2019 12:19AM
मडगाव : प्रतिनिधी
गोव्यात काँग्रेस विरोधी पक्षात असल्याने त्यांनी आम्हाला सहकार्य द्यायला हवे होते. मात्र प्रदेश काँग्रेस  पदाधिकार्‍यांची कृती पाहिल्यास ते मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे सरकार सावरण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे, अशी टीका करून प्रदेश काँगे्रस नेत्यांच्या कृतीवर गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा तथा आमदार विजय सरदेसाई यांनी आश्चर्य व्यक्‍त केले आहे. मडगाव येथे एका वैद्यकीय  शिबिराचे उद्घाटन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.  एकाच विचारसरणीचे लोक यशस्वीरीत्या महाराष्ट्रात एकत्र आले असून चांगला समन्वय निर्माण झाला आहे. शिवसेनेच्या सदस्यांना ओळखत असल्याने आम्ही गोव्यातही लोकहितासाठी या प्रक्रियेची पुनरावृत्ती करण्याचा विचार केला आहे, असेही ते म्हणाले.

गोवा फॉरवर्ड हा  जसा प्रादेशिक पक्ष आहे तसाच महाराष्ट्रात सत्तेत आलेला  शिवसेना पक्षही  प्रादेशिक अस्मिता जपणारा आहे. महाराष्ट्रात झालेल्या राजकीय घडामोडींतून चांगला अनुभव मिळाला असून त्यांनी जनतेचे हित प्रामुख्याने जपले आहे, असे सरदेसाई यांनी सांगितले. 

काँग्रेस पक्ष भाजप सरकारला वारंवार सावरण्याचा प्रयत्न करत असल्याचे घडोघडी समोर आले आहे. काँग्रेस पक्ष विरोधी पक्ष असूनही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना साथ कशी देऊ शकतो, याचे आश्चर्य वाटत असल्याचे ते म्हणाले. काँग्रेस पक्ष भाजप सरकारला सहकार्य देत असल्याने यात लोक पिचत आहेत. 

समविचारींनी एकत्र यायला हवे, त्यातून गोव्याचा विकास होईल. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे स्वहित पाहत असून ते केवळ लोकांचा विश्वासघात करत आहेत.  त्यांची कारस्थाने लोकांसमोर आणण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. 

राजकारणामध्ये विजय सरदेसाई यांनी आपला मार्ग गमावला आहे, या उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना सरदेसाई म्हणाले की, आजगावकर हे व्यक्‍तिगत हिताकडे पाहत नाहीत आणि त्यानुसार लोकांना बहुजन समाजाचे नेते व हितचिंतक म्हणून घोषित करतात. त्यांना याशिवाय दुसरे काहीच करता येत नाही, असे ते म्हणाले. चर्चिल आलेमाव यांनी डॉ. प्रमोद सावंत यांच्या मुख्यमंत्रिपदाचे समर्थन केल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्‍त केले असून ते म्हणाले की, आज गोव्यात जे घडत आहे ते मुख्यमंत्र्यांच्या छुप्या धोरणामुळे होत आहे.