Thu, May 28, 2020 07:18होमपेज › Goa › खाण लीज भ्रष्टाचारप्रकरणी सीबीआयकडे 7 दिवसात तक्रार 

खाण लीज भ्रष्टाचारप्रकरणी सीबीआयकडे 7 दिवसात तक्रार 

Last Updated: Jan 23 2020 1:45AM
मडगाव ः पुढारी वृत्तसेवा  

राज्यातील 88 खनिज खाणींच्या लीज नूतनीकरण व्यवहारात मोठा घोटाळा झालेला असून त्यात तत्कालीन लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या बरोबर दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व विद्यमान मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत सुद्धा गुंतलेले आहेत.त्या लीज नूतनीकरण व्यवहाराची सीबीआय मार्फत चौकशी केली जावी, तसेच त्या व्यवहारात सहकार्य केलेल्या सरकारी अधिकार्‍यांना निलंबित केले जावे,अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी बुधवारी  येथे पत्रकार परिषदेत केली.येत्या सात दिवसात काँग्रेस पक्षाकडून सीबीआयकडे रितसर तक्रार नोंदवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

चोडणकर म्हणाले,की खनिज खाणींच्या लीज नूतनीकरण व्यवहारात घोटाळा झालेला  असून त्याविषयी काँग्रेस पक्षाने पोलिस,राज्यपाल तसेच लोकायुक्तांकडे तक्रार नोंदवली होती.पण त्या तक्रारींचे पुढे काहीच झाले नाही.उत्तर गोव्याचे तत्कालिन पोलीस अधीक्षक कार्तिक कश्यप यांनी त्या तक्रारींत काहीच तथ्य नसल्याचे सांगून फाईल बंद केली होती.पण त्या 88 खाणींच्या लीजचे नूतनीकरण अत्यंत घाईघाईत झाले असून ही भ्रष्टाचारी कृती असल्याने माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, तत्कालिन खाण संचालक प्रसन्ना आचार्य आणि तत्कालीन   खाण सचिव पवन कुमार सेन यांच्या विरोधात भ्रष्टाचार विरोधी पथकाने गुन्हा नोंदवावा ,असा आदेश गोवा लोकायुक्तांकडून देण्यात आल्यामुळे सदर प्रकरणाला वाचा फुटली आहे.या प्रकाराची निःपक्षपाती पणे चौकशी व्हावी, या साठी हे प्रकरण सीबीआय कडे सोपवावे.

तत्कालिन पोलीस अधीक्षक कार्तिक कश्यप     यांच्यावर हे प्रकरण दडपण्यासाठी दबाव आला होता.तत्कालिन  मुख्यमंत्री स्व.पर्रीकर यांना वाचवण्यासाठी सदर प्रकरणाची फाईल त्यावेळी बंद करण्यात आल्याचा आरोपही  चोडणकर यांनी केला. लीज नूतनीकरणाच्या व्यवहाराची सुरुवात तत्कालिन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या कडून सुरू झाली होती. सरकार ही अखंडित प्रक्रिया असल्याने आपण ते सोपस्कार पूर्ण केले होते,

अशी माहिती माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी लोकायुक्तांना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केली आहे ,असे गिरीश चोडणकर म्हणाले.त्या 88 खाणींच्या लीज नूतनीकरण घोटाळ्याप्रकरणी येत्या सात दिवसात सीबीआयकडे तक्रार नोंद केली जाणार आहे.या पूर्वी सुद्धा काँग्रेस पक्षाने या संदर्भात सरकार दरबारी लेखी तक्रारी केल्या होत्या.आता लोकायुक्तांनी दिलेल्या आदेशाची प्रत नवीन तक्रारीला जोडली जाईल,असे  चोडणकर म्हणाले. या पत्रकार परिषदेत चोडणकर यांच्या बरोबर माजी नगरसेवक दामू शिरोडकर उपस्थित होते.

‘अपात्रता याचिकेवर लवकर निर्णय घ्या’

काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केलेल्या त्या दहा आमदारांच्या विरोधात सभापती राजेश पाटणेकर यांच्या समोर दाखल करण्यात आलेली अपात्रता याचिका ऑगस्ट 2019 पासून प्रलंबित आहे.  23सप्टेंबर 2019 रोजी एकदाच सभापतिंनी अपात्रता याचिकेवर सुनावणी घेतली होती.त्याच वेळी आमचे वकील अभिजीत गोसावी यांना बोलावण्यात आले होते,त्यानंतर एकही सुनावणी घेतली गेली नाही, अशी माहिती  चोडणकर यांनी यावेळी दिली.काँग्रेस पक्षामध्ये फूट पडलेली नाही.त्यामुळे या काँग्रेसच्या     दहा आमदारांच्या भाजपात केलेल्या प्रवेशाला प्रदेश काँग्रेसने आव्हान दिले होते.त्या याचिकेवर ताबडतोब सुनावणी होईल,असे गृहीत धरून आम्ही सभापतिंसमोर याचिका सादर केली होती.

मात्र 2019 पासून त्या याचिकेवर कोणतीही सुनावणी झालेली नाही.सर्वोच्च न्यायालयाने मणिपूर विधानसभेच्या आमदार अपात्रता प्रकरणी दिलेल्या निर्देशांप्रमाणे   अपात्रता याचिकेवर निर्णय घेण्यासाठीचा  कालावधी निश्‍चित करण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केलेल्या त्या दहा आमदारांवरील अपात्रता याचिकेवर लवकरात लवकर निर्णय घेतला जावा, अशीही मागणी गिरीश चोडणकर यांनी केली.