Mon, Sep 16, 2019 05:29होमपेज › Goa › तीन लाखांना फसवल्याची ‘अवगूर’विरूद्ध तक्रार

तीन लाखांना फसवल्याची ‘अवगूर’विरूद्ध तक्रार

Published On: Jan 13 2019 1:36AM | Last Updated: Jan 13 2019 12:27AM
पणजी :  प्रतिनिधी

अवगूर  इस्टेट कंपनी  या बनावट नोकरभरती  एजन्सीकडून 3 लाख रुपयांची फसवणूक केल्याची अन्य एक तक्रार पणजी पोलिस स्थानकात भगवंत नाईक यांनी दाखल केली आहे. या कंपनीकडून रशिया येथे नोकरी देण्याचे आमिष दाखवून 3 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, या बनावट नोकर भरती  एजन्सीकडून  फसवणूक झाल्याप्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाकडे आलेल्या तक्रारींचा आकडा 63 इतका झाला आहे. या सर्वांची जबानी नोंद करण्याचे काम सुरु असल्याची माहिती विभागाचे निरीक्षक राहुल परब यांनी दिली.

या प्रकरणातील संशयित बसेरा हॉटेलचे मालक विजय तुलसीयानी तसेच अ‍ॅण्ड्रयू रॉड्रिग्स यांचे जामीन अर्ज पणजी न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. त्यांना प्रत्येकी चार दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवण्यात आले आहे.

अवगूर इस्टेट कंपनी या नावाने बनावट नोकरभरती एजन्सी स्थापन करून युवकांना विदेशात नोकरी देण्याचे आमिष दाखवले जात होते. नोकरीसाठी मुलाखती घेऊन त्यांच्याकडून  प्रत्येकी  एक लाख रुपये घेतले जात होते  

बनावट कागदपत्रांच्या आधारे अवगूर इस्टेट कंपनी या नावाने   बोगस नोकरभरती एजन्सी स्थापन करण्यात आल्याची तक्रार गुन्हा अन्वेषण विभागाकडे आली होती. प्राथमिक तपासानंंतर 8 जानेवारी रोजी या प्रकरणी एफआयआर नोंद करण्यात आला होता. 

तुलसीयानी व रॉड्रिग्स या  दोन्ही संशयितांवर बुधवारी अटकेची कारवाई करण्यात आली. गुन्हा अन्वेषण विभागाकडे फसवणूक  झाल्याची तक्रार घेऊन आतापर्यंत 63 जण आले असून कंपनीने प्रत्येकी 1 लाख रुपये त्यांच्याकडून घेतल्याची त्यांची तक्रार आहे. या आकड्यात आणखीनही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.