Thu, May 28, 2020 06:06होमपेज › Goa › प्रियांका गांधींबाबत आक्षेपार्ह ट्विट केल्यासंदर्भात तक्रार

प्रियांका गांधींबाबत आक्षेपार्ह ट्विट केल्यासंदर्भात तक्रार

Published On: Feb 05 2019 1:55AM | Last Updated: Feb 05 2019 12:16AM
पणजी : प्रतिनिधी

काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या विरोधात  आक्षेपार्ह संदेश सोशल मीडियावर लिहिल्याच्या निषेधार्थ गोवा प्रदेश महिला काँग्रेस समितीने अज्ञाताविरोधात सोमवारी पणजी येथील पोलिस मुख्यालयात जाऊन पोलिस महासंचालकांकडे तक्रार सादर केली. दरम्यान, सदर प्रकरणात लक्ष घालू. त्याचबरोबर त्वरित कारवाई करू, असे आश्‍वासन  पोलिस महासंचालक डॉ. मुक्तेश चंदर यांनी महिला काँग्रेसच्या शिष्टमंडळाला दिले. गोवा प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अ‍ॅड. प्रतिमा कुतिन्हो  यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने    पोलिस महासंचालकांची भेट घेतली. या पार्श्‍वभूमीवर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

कुतिन्हो म्हणाल्या की, प्रियांका गांधी यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह  ट्विट तसेच  संदेश लिहिण्यात आले आहेत. यामागे भाजपचा हात आहे. सदर प्रकार  निषेधार्ह आहे. याप्रकरणी  पोलिस महासंचालकांकडे तक्रार दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

प्रियांका गांधी यांची नुकतीच काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती  करण्यात आली आहे. त्या सक्रिय राजकारणात  आल्यानेच त्यांच्या विरोधात अशा प्रकारे  ट्विट केले जात आहे. गांधी परिवाराने  देशासाठी खूप  त्याग केला आहे. मात्र, भाजपकडून काँग्रेस नेत्यांवर टीका केली जाते.  काँग्रेसविरोधात  सोशल मीडियात अशा प्रकारचे संदेश तसेच ट्विट लिहिण्यासाठी भाजपने आयटी क्षेत्रातील आपल्या लोकांना कामावर घेतले असल्याचा आरोपही  कुतिन्हो यांनी केला.

आक्षेपार्ह ट्वीटचा प्रकार निंदनीय आहे. भाजपकडून महिलांचा सन्मान केला जात नाही.   ट्विटच्या माध्यमातून   प्रियांका गांधी यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे सदर प्रकार हा कायद्याने गुन्हा ठरतो, याप्रकरणी माहिती व तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा नोंद केला जावा, अशी मागणी तक्रारीव्दारे करण्यात आल्याचेही कुतिन्हो यांनी सांगितले. प्रदेश महिला काँग्रेसच्या नेत्या बीना नाईक, प्रतिभा बोरकर व अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.