Sun, May 31, 2020 15:22होमपेज › Goa › राज्यात दहावी परीक्षेला प्रारंभ

राज्यात दहावी परीक्षेला प्रारंभ

Last Updated: May 22 2020 1:32AM
पणजी : पुढारी वृत्तसेवा 

राज्यात इयत्ता दहावीच्या परीक्षेला इंग्रजी  भाषेच्या पेपरने   गुरुवारी सुरुवात झाली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या द़ृष्टीने परीक्षा केंद्रांचे  निर्जंतुकीकरण करण्यात आले.सुरक्षित अंतर,  मास्क परिधान करण्यासंबंधी नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांनी पेपर सोडवला. शिक्षण मंडळाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा नियमांचे पालन होते की नाही, यासंदर्भात परीक्षा केंद्रांवर देखरेख ठेवण्यात आली. 

यंदा दहावीच्या परीक्षेला राज्यातील 19680 विद्यार्थी बसले आहेत. यात 9 हजार 790 मुले व 9 हजार 980 मुलींचा समावेश आहे. सदर परीक्षा 29 मुख्य व 179 उपकेंद्रांवर घेतली जात आहे. याशिवाय महाराष्ट्र व कर्नाटकात अनुक्रमे 243 व 4 विद्यार्थ्यांना सीमावर्ती भागातील परीक्षा केंद्रात परीक्षा देण्यासाठी  एकूण 6 परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रात 4 व कर्नाटकातील 2 परीक्षा केंद्रांचा समावेश आहे.

पणजीसह राज्यातील विविध शहरांमध्ये दहावी परीक्षेसाठी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.  सकाळी पालक आपल्या मुलांना या केंद्रांवर घेऊन येताना दिसून आले. परीक्षा केंद्रात जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांची थर्मल गनद्वारे तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या  तसेच पालकांच्या चेहर्‍यावर काही प्रमाणात परीक्षेचा ताण दिसून येत होता. पालक तसेच विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राच्या दारात गर्दी करू नये, याचीसुद्धा विशेष काळजी घेतली जात होती. सकाळी 9 वाजता परीक्षेला सुरुवात झाली. परीक्षा सुरू होण्याच्या 30 मिनिटे अगोदर सर्व विद्यार्थी आपल्या संबंधित परीक्षा केंद्रात हजर  झाले होते. 

परीक्षेसाठी केंद्रात जाताना विद्यार्थ्यांनी गर्दी करु नये, म्हणून प्रत्येक परीक्षा केंद्राबाहेर  शिक्षण मंडळाचे अधिकारी तसेच शिक्षकांकडून सुध्दा विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन केले जात होते. विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता परीक्षा केंद्रांचे सॅनिटायझेशन करण्यात आले होते. त्याचबरोबर प्रत्येक परीक्षा केंद्राच्या  प्रवेशव्दारावरच बाहेर सॅनिटायझर ठेवण्यात आले होते. विद्यार्थ्यांना  हात सॅनिटाईझ केल्यानंतरच त्यांना केंद्रात प्रवेश दिला जात होता. परीक्षा केंद्रावर वैद्यकीय पथक तैनात ठेवण्यात आले आहे. ग्लुकोज आणि लहान पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्था करण्यात  आली होती.