Mon, May 25, 2020 09:28होमपेज › Goa › म्हादईप्रश्नी अपयश; मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

म्हादईप्रश्नी अपयश; मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

Last Updated: Feb 29 2020 1:50AM
पणजी : पुढारी वृत्तसेवा 
म्हादईचे रक्षण करण्यात गोव्याचे  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत अपयशी ठरले असून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करून गोवा युवा फॉरवर्डने शुक्रवारी पणजीत मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले.मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत मुर्दाबाद ,आमची म्हादई विकली अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. 

गोवा युवा फॉरवर्डचे नेते राज मळीक म्हणाले,की  म्हादईच्या पाणी वाटपासंदर्भात जलतंटा लवादाने कर्नाटकला दिलेला निवाडा केंद्र  सरकारने अधिसूचित केला. याचा फटका गोव्याला बसणार आहे. मात्र गोवा सरकारने प्रामुख्याने मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी म्हादई वाचवण्यासाठी कसलेच प्रयत्न केले नाहीत. गोव्याच्या खासदारांकडून देखील आवश्यक ते प्रयत्न झाले नाहीत. सदर निवाडा अधिसूचित करणे म्हणजे गोवा सरकारचे केंद्र सरकारकडे  काहीच चालत नसल्याचे निदर्शक आहे. म्हादईचा निवाडा अधिसूचित केल्याने हा दिवस  गोव्यासाठी काळा दिवस ठरला आहे,अशी टीका त्यांनी केली.

म्हादई प्रश्नी गोवा फॉरवर्ड पक्षाकडून आंदोलने केली जातात व त्यावर मुख्यमंत्री डॉ. सावंत हे नौटंकी असल्याची टिप्पणी करतात. विरोधकांवर टीका करण्याऐवजी त्यांनी म्हादई प्रश्न गांभीर्याने घ्यायला हवा होता. केंद्रात तसेच राज्यात भाजपचे सरकार आहे. मात्र असे असूनही म्हादईबाबत गोव्याला अपयश आले आहे. याचा गोवा युवा फॉरवर्ड तीव्र शब्दात निषेध करीत आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा त्वरीत राजीनामा द्यावा, अशी मागणीही मळीक यांनी केली.