Tue, May 26, 2020 04:53होमपेज › Goa › मुख्यमंत्री पर्रीकर यांचा मिरामार किनारी फेरफटका

मुख्यमंत्री पर्रीकर यांचा मिरामार किनारी फेरफटका

Published On: Mar 05 2019 1:46AM | Last Updated: Mar 04 2019 11:52PM
पणजी : प्रतिनिधी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा दिसून येत आहे. पर्रीकर यांनी त्यांना बरे वाटू लागल्याने सोमवारी दुपारी मिरामार येथे गाडीत बसूनच फेरफटका मारला असल्याचे सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री पर्रीकर यांची सोमवारी कृषी मंत्री तथा गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी भेट घेतली. आपण दक्षिण गोव्यात जुवारी पुलाचे काम कुठवर पोचलेय ते लवकरच पाहून येणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी आपणास सांगितल्याचे  विजय सरदेसाई यांनी पर्रीकर यांची भेट घेऊन आल्यानंतर पत्रकारांना सांगितले. 

मुख्यमंत्री पर्रीकर यांची प्रकृती आपल्याला खूप चांगली दिसली. ते खूपवेळ आपल्याशी बोलले. जुवारी पुलाच्या कामाची पाहणी करण्यासाठी आता लवकरच निघतील, असेही विजय सरदेसाई यांनी सांगितले. यामुळे पत्रकारही जुवारी पुलाकडे जाऊन थांबले. मात्र, मनोहर पर्रीकर प्रत्यक्षात दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास निवासस्थानातून वाहनाने बाहेर आले व थेट मिरामारकडे रवाना झाले. तिथे किनार्‍यावर फेरफटका मारून ते माघारी परतले. 

मनोहर पर्रीकर यांच्या सेवेसाठी गोमेकॉचे डॉ. कोलवाळकर आहेत.  मनोहर पर्रीकर यांचा चेहरा नेहमीपेक्षा आता वेगळा दिसतो. म्हणजेच त्यात बर्‍यापैकी सुधारणा दिसते. ‘एम्स’च्या दोघा डॉक्टरांनी गेल्याच आठवड्यात मनोहर पर्रीकर यांना गोमेकॉत तपासले होते. पर्रीकर यांच्या आरोग्यात सुधारणा झाली असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला होता. त्यांनी दिलेली औषधे पर्रीकर यांच्यासाठी योग्य ठरू लागली आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

पर्रीकर यांचा चाचणी अहवाल ‘एम्स’कडे

करंजाळे-दोनापावल येथील खासगी निवासस्थानी मनोहर पर्रीकर आहेत. रविवारीच पर्रीकर यांनी बांबोळीच्या गोमेकॉ इस्पितळात तपासणी करून घेतली होती. त्यांचे स्कॅनिंगही करून ते अहवाल दिल्लीच्या ‘एम्स’ संस्थेला पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.