Fri, May 29, 2020 22:41होमपेज › Goa › मुख्यमंत्री पर्रीकर सोमवारपासून सक्रिय

मुख्यमंत्री पर्रीकर सोमवारपासून सक्रिय

Published On: Sep 08 2018 1:31AM | Last Updated: Sep 08 2018 8:32AMपणजी : प्रतिनिधी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे अमेरिकेहून गोव्यात दाखल झाले तरी, प्रत्यक्ष मंत्रालयात येत्या सोमवारपासून कामकाजाला सुरूवात करणार आहेत. दोनापावल येथील आपल्या निवासातून त्यांनी काही प्रमाणात कामकाज हाताळून महत्त्वाच्या काही फाईल हातावेगळ्या केल्या असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी सांगितले. 

मुख्यमंत्री तूर्त दोनापावल येथील आपल्या निवासस्थानी असून ते फोनद्वारे वरिष्ठ सरकारी अधिकार्‍यांच्या संपर्कात आहेत.  मुख्यमंत्री शुक्रवारी मंत्रालयात आले नाही. गेले बरेच आठवडे मंत्रिमंडळाची एकही बैठक झालेली नसून प्रशासनही संथ झालेले आहे. कारण आणखी दोन मंत्री गेले काही महिने इस्पितळातच आहेत. मुख्यमंत्री येत्या आठवड्यात मंत्रिमंडळाची बैठक घेतील, असे सूत्रांनी सांगितले. 

पर्रीकर अमेरिकेहून बुधवारी मुंबईला व तेथून गोवा असा सतत 24 तासांचा प्रवास करून गोव्यात आले. या प्रवासामुळे त्यांना थोडा थकवा आलेला आहे. हा ‘जेट लेग’चा प्रकार असून त्यावर विश्रांती घेणे हाच एकमेव उपाय आहे, असेही सूत्रांनी सांगितले. याआधी, अमेरिकेला गेलेले पर्रीकर 22 ऑगस्ट रोजी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश घेऊनच राज्यात दाखल झाले होते. हा अस्थिकलश घेऊन ते काही अंतर चालल्यामुळे त्यांना थकवा आला होता. यानंतर 23 ऑगस्ट रोजी त्यांना उलट्या झाल्याने आणि अस्वस्थपणा जाणवल्याने त्याच दिवशी मुंबईला आणि नंतर अमेरिकेला उपचारासाठी नेण्यात आले होते.