Wed, May 27, 2020 05:39होमपेज › Goa › कौशल्य विकसित करण्यावर भर देणार : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

कौशल्य विकसित करण्यावर भर देणार : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

Last Updated: Dec 01 2019 10:50PM
वाळपई : प्रतिनिधी

आज राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढत असली हे जरी खरे असले तरी त्यामागची कारणे अनेक आहेत.   गेल्या अनेक वर्षापासून  बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आगामी  काळात शिक्षणातून  कौशल्य विकसित करण्यावर शिक्षण खाते भर देणार आहे. यामुळे  कौशल्याच्या आधारे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कमी शिक्षित मुलेसुद्धा आपले भवितव्य घडवू शकतात, असे  प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ.  प्रमोद सावंत यांनी केले.

साखळी रवींद्र भवनात  सत्तरी अर्बन क्रेडिट सोसायटी यांच्या पुढाकाराने  सत्तरीतील सर्व विद्यालयातील दहावीच्या मुलांसाठी  आयोजित केलेल्या करिअर मार्गदर्शन शिबिरात मुख्यमंत्री सावंत  बोलत होते. व्यासपीठावर शिक्षण खात्याचे उत्तर गोवा उपसंचालक मनोज सावईकर, सत्तरी  अर्बनचे  अध्यक्ष अ‍ॅड यशवंत गावस, सत्तरी तालुका शाळा समूह अध्यक्ष रोझी फर्नांडिस, संस्थेचे संचालक प्रेमनाथ हजारे, अ‍ॅड. काशिनाथ म्हाळशेकर, कृष्णा गावस, वासुदेव परब, फरीद खान, म्हाळू गावस, वाळपई विभाग शिक्षणाधिकारी भालचंद्र भावे,  डॉ. प्रकाश पर्येकर उपस्थित होते.

ग्रामीण भागातील पालकांना आपल्या मुलांकडे शिक्षणासाठी  वेळ देणे अनेक कारणास्तव जमत  नाही. यामुळे  मुलांचे भवितव्य घडविण्याची  जबाबदारी शिक्षकांवर असते.   राज्यातील कोणत्याही मुलांचे शिक्षण निधीअभावी अडणार नाही याची काळजी सरकार घेणार आहे.  मात्र मुलांनी कष्ट, जिद्द व चिकाटी यातून आपल्या भविष्या  संदर्भात गंभीर होणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
शिक्षकांनी मुलांना भविष्या संदर्भात वाटा दाखविल्यास त्यातून विद्यार्थी घडू शकतात.  राज्यात  वाढणारी बेरोजगारांची संख्या  लक्षात घेता याला पूर्णपणे शिक्षण खात्याची यंत्रणा जबाबदार आहे.  शिक्षणात  कौशल्य प्रणाली आणणे  गरजेचे होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आज बेरोजगारांची संख्या  वाढत आहे .मुलांना आज खर्‍या अर्थाने पारंपारिक शिक्षण देण्याची गरज आहे.   शिक्षणाचे तंत्र विकसित करण्यासाठी शिक्षकांसाठी सुट्टीच्या दिवसात कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असून शिक्षकांनी प्रत्येक मुलाच्या पालकांसोबत बसून मुलांच्या भवितव्या संबंधित संवाद साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले.

मनोज सावईकर  म्हणाले, की  सत्तरी अर्बन सारख्या संस्था शिक्षण क्षेत्रात चांगले योगदान देऊन समाजाच्या विकासासाठी हातभार लावत आहेत. संस्थाकडून मुलांना दर्जेदार शिक्षण दिले जात आहे. मुलानी आपल्या भविष्य घडविण्यासाठी  मिळणार्‍या प्रत्येक संधीचा सदुपयोग करावा.

यशवंत गावस  म्हणाले, की मुलांनी  शॉर्टकट मार्गाचा अवलंब न करता आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी प्रयत्न करावेत. करिअर मार्गदर्शन शिबिरात  डॉ. प्रकाश पर्येकर व नारायण देसाई यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्या संदर्भात संधीचे मार्गदर्शन केले. या मार्गदर्शन शिबिरात सत्तरी तालुक्यातील सर्व माध्यमिक विद्यालयाच्या दहावी इयत्तेतील सुमारे 700 विद्यार्थ्यांनी  सहभाग दर्शविला. विद्यार्थ्यांबरोबरच   मुख्याध्यापक व शिक्षकांनी भाग घेतला होता.गोपिनाथ गावस यांनी  सूत्रसंचालन केले. रोझी फर्नांडिस यांनी  आभार मानले . 

मुलांची योग्यता चाचणी आवश्यक: मुख्यमंत्री 

शिक्षणाच्या नवीन कार्यप्रणाली नुसार प्रत्येक विद्यार्थ्याची  योग्यता चाचणी परीक्षा  घेण्यात येणार आहे. या चाचणीमुळे त्यांची काय योग्यता,  कार्यक्षमता, बौध्दिक क्षमता दिसून येणार आहे.  त्याप्रमाणे कौशल्य शिक्षण घेणे लाभ दायक ठरणार आहे. या संदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश आपण शिक्षण संचालकांना  दिले असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.