Wed, May 27, 2020 10:54होमपेज › Goa › शेतात रसायनयुक्‍त पाणी; भंगार अड्ड्यांवर कारवाई करा 

शेतात रसायनयुक्‍त पाणी; भंगार अड्ड्यांवर कारवाई करा 

Published On: Sep 21 2019 1:30AM | Last Updated: Sep 21 2019 1:30AM
म्हापसा : प्रतिनिधी 

अम्यानी मुशीरवाडा कोलवाळ येथे  अगुस्तीन डिसोझा यांच्या शेतात घातक रसायनयुक्त पाणी सोडल्याप्रकरणी मेहमूद अस्सलाम उर्फ पप्पू यांच्या मालकीच्या भंगार अड्ड्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी कोलवाळ पंचायतीने गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे ठरावाद्वारे केली आहे. 

बुधवारी सकाळी पंचायत कार्यालयात सरपंच नित्यानंद कांदोळकर यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत मंडळाची पंधरवडा बैठक झाली. या बैठकीत शेतकरी डिसोझा यांच्या सर्व्हे क्रमांक  207/9, 207/10 व 207/11 मध्ये सुमारे एक हजार चौरस मीटर शेतजमिनीत शेजारील भंगारातून रसायनयुक्त घातक पाणी सोडण्यात आल्याच्या प्रकारावर चर्चा करण्यात आली.शेतीमध्ये रसायनयुक्त पाणी सोडणे हा प्रकार गंभीर असून शेत जमिनीच्या नासाडी सह घातक पाण्यामुळे गावात प्रदूषण व रोगराई पसरण्याची शक्यता पंचायत मंडळाने व्यक्त केली. नंतर या भंगार अड्ड्यावर कडक  कारवाई करण्याचा ठराव सर्वानुमते संमत करण्यात   आला. 

कारवाईसाठी या ठरावाच्या प्रती पर्यावरण मंत्री नीलेश काब्राल, थिवीचे  आमदार निळकंठ हळर्णकर, पंचायत संचालक, उत्तर गोवा जिल्हाधिकारी, बार्देशचे उपजिल्हाधिकारी, मामलेदार, म्हापसा  पोलीस आरोग्य खात्याना  पाठवण्यात आले आहेत. पंचायत क्षेत्रातील अवैध भंगार अड्ड्यामध्ये रात्रीच्या वेळी टाकाऊ भंगाराला आग लावून मोठ्या प्रमाणात प्रदूषण केले जाते. हे प्रदूषण रहिवाशांसाठी घातक आहे. याप्रकरणी कारवाई करण्याची विनंती या अगोदर पंचायतीने पत्र पाठवून केली आहे. वरील ठरावा सोबत त्याच्याही प्रति जोडल्या आहेत. पंचायत मंडळाने भंगार अड्ड्यातून  शेत जमीनीत सोडलेल्या घातक रसायन मिश्रीत पाण्याची गंभीर दखल घेतली आहे. 

या भंगार अड्ड्याविरुद्ध कडक  कारवाई करण्याचा सर्वानुमते ठराव पंचायत मंडळाकडून घेण्यात आला आहे. सरकारकडून या गंभीर गुन्ह्याची दखल घेण्याची अपेक्षा पंचायत मंडळाला आहे, अशी माहिती सरपंच नित्यानंद कांदोळकर यांनी दिली.मंगळवार दि. 17 सप्टेंबर रोजी शेतकरी अगुस्तीन डिसोझा यांना आपल्या शेतजमिनीत मेहमूद असलाम उर्फ पप्पू यांच्या भंगारातुन घातक रसायनयुक्त पाणी सोडल्याचे दिसून आले.  

शेतात सोडण्यात आलेल्या या पाण्यामुळे शेत जमिनीतील झाडे झुडपे मरून गेली असल्याची लेखी तक्रार केली होती. या तक्रारीच्या आधारे पंचायत मंडळाने आरोग्य केंद्राच्या स्वच्छता अधिकार्‍यांच्या सहाय्याने त्या भंगार अड्ड्याची पाहणी केली होती. पाहणीच्या अहवालानुसार पंचायत मंडळाने ठराव घेतला आहे. कोलवाळ पंचायतीने पंचायत क्षेत्रातील भंगार  विरुद्ध कडक धोरण अवलंबले आहे.      

पंचायतीने हे धोरण शिथिल करावे, भंगार अड्ड्याची  कापलेली वीज व पाणी जोडणी  पुन्हा सुरू करावी, व्यवसाय करण्यास मुभा द्यावी, अशी मागणी मोहम्मद खान यांच्या नेतृत्वाखाली भंगार अड्ड्यांच्या मालकांनी   निवेदनाद्वारे केली आहे. परंतु पुढील कारवाई टाळण्यासाठी भंगार अड्डे स्वतःहून हटवावेत, असा सल्ला मालकांना पंचायत मंडळाने भंगार अड्डेमालकांना दिला आहे.